बदलापूर-नगर एसटी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

आमदार किसन कथोरे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
बदलापूर-नगर एसटी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

बदलापूर: बदलापूरवरून अहमदनगर जिल्ह्यात जाण्यासाठी होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी मुरबाडमार्गे बदलापूर - अहमदनगर एसटी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी बदलापुरात राहणाऱ्या नगर जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. बदलापूर शहरात अहमदनगर जिल्ह्यातील ओतूर, वेल्हा, आळे फाटा, आणे, टाकळी ढोकेश्वर, पारनेर, जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना शेतीच्या वा अन्य कौटुंबिक कामानिमित्त तसेच सणासुदीला अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या मूळ गावी जावे लागते. मात्र त्यासाठी त्यांना बदलापूरहून कल्याण वा मुरबाडला जाऊन नगरसाठी एसटी बस पकडावी लागते. त्यामुळे होत असलेला वेळेचा अपव्यय व गैरसोय टाळण्यासाठी बदलापूर एसटी स्थानकातून मुरबाड मार्गे नगरपर्यंत एसटी बस सेवा सुरू करावी, अशी बदलापुरात राहणाऱ्या नगर जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. तर आमदार किसन कथोरे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in