पिंपळास गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल; नळ पाणीपुरवठा योजना अर्धवट राहिल्याने नाराजी

भिवंडी तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायतसाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेले नळ पाणीपुरवठा योजना दीड वर्षे झाली तरी अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पिंपळास गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल; नळ पाणीपुरवठा योजना अर्धवट राहिल्याने नाराजी
Published on

सुमित घरत/भिवंडी

भिवंडी तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायतसाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेले नळ पाणीपुरवठा योजना दीड वर्षे झाली तरी अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याप्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तालुक्याच्या ग्रामीण नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या योजना ठेकेदार आणि संबंधित ग्रामीण पुरवठा विभागातील काही अधिकारी या योजनेच्या भ्रष्ट कारभारात अडकून पडल्याचा आरोप ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांकडून केला जात आहे. भिवंडी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नळ’ ही योजना रखडल्याने ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल होत आहे. यापूर्वी ही योजना आदिवासी भागात न राबविल्याने श्रमजीवी संघटनेनेही आंदोलन छेडले होते. तसेच तालुक्यातील वाहूली गावात ही योजना अर्धवट स्थितीत असल्याने गावातील ग्रामस्थांच्या ठेकेदाराविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आता मौजे पिंपळास ग्रामपंचायत क्षेत्रात ही योजना मरणावस्थेत असल्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई होणे अपेक्षित असताना त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तरी संबंधित ठेकेदारास दिलेला ठेका रद्द करण्यासाठी शासकीय स्तरावर योग्य ते प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली असून याबाबत जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागास लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपळास गावातील पांडुरंग नागांवकर, शरद नागांवकर, सोमवार म्हात्रे, देवनाथ ठाणगे, गणेश म्हात्रे, भरत घरत, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, मनोज म्हात्रे, मनोज चौधरी, नागेश म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पाणी योजनेपासून दीड वर्षे वंचित

मौजे पिंपळास येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेचा भूमिपूजन सोहळा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर ठेकेदाराने पाण्याच्या टाकीचे अर्धवट काम करून व काही ठिकाणी खोदाई करून पाइपलाइन टाकले. त्यानंतर ठेकेदाराने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. १ कोटी ८५ लाख ४० हजार १७३ रुपये अंदाजपत्रक असणाऱ्या कामाचा ठेकेदाराने बोजवारा उडवला आहे. गावात झालेले कामही निकृष्ट दर्जाचे व अर्धवट राहिल्याने पिंपळास गाव पाणी योजनेपासून सुमारे दीड वर्षापासून वंचित आहे. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in