

ठाणे : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हजारो जणांनी आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शप) राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. वांगचुक यांचे उपोषण संपविण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. याच ठिकाणी अभिजीत दीपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय, संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकूमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आव्हाड म्हणाले की, १९७३ साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ते आंदोलन पेटले आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तियानमेन चौक करू नका. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या; लाठीचार्ज केला की काय होते, हे सबंध चीनने पाहिले होते. तुम्ही विद्यार्थ्यांवर दबाव आणू नका. भगतसिंग यांचे वय २७ होते, राजगुरूंचे वय २६ होते व सुखदेव २६ वर्षांचे होते. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली, की ते तो कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत. आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. हा आगडोंब उसळला आहे.
आता देश वाचविण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले. मनोज प्रधान म्हणाले की, आजचे जे आंदोलन आहे, ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये विद्यार्थी आणि लोक स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले आहेत. आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचे होते, पण आज इतके विद्यार्थी स्वतःहून आलेले आहेत. म्हणजे आता लोकांना कळायला लागलंय की १२ वर्षे जे ते झेलतायत, त्याच्या विरोधात आता ते गप्प बसणार नाहीत. ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचे तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतेय, असे त्यांनी सांगितले.
वसईत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन
वसई : सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला. केंद्र सरकारने विद्यार्थी, पर्यावरण आणि लडाखच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्सी डाबरे, जॉन परेरा, समीर वर्तक, ॲड. रॉबर्ट डाबरे, ॲड. धनंजय चव्हाण, ॲड. अनिल चव्हाण, लिनस डिकुन्हा व इतर नागरिक उपस्थित होते. आंदोलनानंतर वसई तहसीलदार दीपक गायकवाड यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, संवैधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ऐरोलीत धरणे आंदोलन
नवी मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना उपोषणस्थळावरून हटविल्याच्या घटनेचा निषेध करत नवी मुंबई युवा संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी ऐरोली येथील दिवा सर्कल, सेक्टर-९ येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तातडीने थांबवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलनात नवी मुंबई युवा संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक प्रतीक जाधव, इंद्रजीत जाधव, राजू सकपाळ यांच्यासह शेकडो महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कर्जतमध्ये पाठिंबा
कर्जत : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत कर्जत तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि जागरूक नागरिकांनी आज सोमवारी निदर्शने करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर तीव्र भावना व्यक्त करीत तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. यात ॲॅड. कैलास मोरे, माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, सचिन भालेराव, जितरत्न जाधव आदी उपस्थित होते.
उल्हासनगरात जनआक्रोश
उल्हासनगर: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उल्हासनगरात सोमवारी नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाशीत घोषणाबाजी
नवी मुंबई : नवी मुंबईत गैरव्यवहाराविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाच्या निषेधार्थ दिल्लीत लढा देणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप गट) नवी मुंबईच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.