ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाला नवसंजीवनी मिळणार

गोर गरीब नागरिकांच्या उपचारासाठी एकमेव असलेल्या सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतराच्या हालचाली वाढल्या आहेत.
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाला नवसंजीवनी मिळणार
Published on

ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय हे जिल्ह्याचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जात असून सध्या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. सिव्हिल रुग्णालय व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत असून भविष्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयाला नवसंजीवनी मिळणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील गोर गरीब नागरिकांच्या उपचारासाठी एकमेव असलेल्या सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतराच्या हालचाली वाढल्या आहेत. ८ सप्टेंबर रोजी निविदा काढण्यात येणार असून त्या नंतर १५ दिवसांत सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीवर हातोडा पडणार आहे. जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या महिन्याभरात मनोरुग्णालय वास्तूच्या परिसरात स्थलांतर करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. यामध्ये मुलांच्या वार्डसोबत डिलिव्हरी वॉर्ड, नेत्रविभाग, ब्लडबँक आदी कक्ष मनोरुग्णालयाजवळील शासकीय इमारतीत या महिना अखेर स्थलांतरित होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली.या सिव्हिल रुग्णालयात सर्जरी, फिजिओथेरपी,आर्थो, इएनटी, आयसीयु आदी जनरल विभाग काही काळ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या जागेवर आता लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला प्रारंभ होणार आहे. या हॉस्पिटलच्या बांधकामाचे सर्व अडथळे दूर निविदेचे काम पूर्णत्वास आले आहे. ६ सप्टेंबरपर्यंत विविध ठेकेदार कंपन्यांनकडून निविदा मागविल्या आणि ८ सप्टेंबरला निविदा उघडण्याचे नियोजन केले आहे.

या सिव्हिल रुग्णालयाच्या जागी तीन बेसमेंट आणि दहा मजली बांधकाम असणाऱ्या दोन भव्य इमारतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. या हॉस्पिटलचे बांधकाम करण्यापूर्वी येथील काही रुग्ण विभाग मनोरुग्णालय परिसरात स्थलांतरित होत आहेत.

या मनोरुग्णालया जवळील जागेत रुग्णसेवा देतेवेळी कोणत्या अडचणी येणार नाहीत, याचे चाचपणी डॉ. पवार यांनी केल्याचेही निदर्शनात आले आहे. तयार होणाऱ्या या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह २०० सुपर स्पेशालिटी बेड, २०० महिला, लहान मुले आणि अत्याधुनिक डिलिव्हरी कक्ष तयार होणार आहे. याशिवाय ५०० बेडचे जनरल हॉस्पिटल आदी ९०० खाटांचे हे भलेमोठे रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेत येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in