सिव्हिल रुग्णालयाची सुपर स्पेशालिटी लागली मार्गी; ५७० कोटींचा खर्च करणार

टेंडर निघत नव्हते त्यामुळे दोन वर्षांपासून सिव्हिल रुग्णालयाची सुपरस्पेशालिटी लटकली असल्याचे उघड झाले होते.
सिव्हिल रुग्णालयाची सुपर स्पेशालिटी लागली मार्गी; ५७० कोटींचा खर्च करणार

ठाणे जिल्ह्याचा नागरीकरणाचा वेग प्रचंड असून एका दशकात लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. मात्र या जिल्ह्यात एकही सुपरस्पेशालिटी रुग्णालय नाही. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करण्याचे प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहेत.

यापूर्वीच्या भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये काही काळ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्यमंत्रिपद होते. त्यामुळे या प्रस्तावाला बऱ्यापैकी चालना मिळाली, दरम्यान एफएसआय वाढल्याने पूर्वी जो ३२५ कोटी खर्च होणार होता, तो आता ५७० कोटी होणार असल्याने या वाढीव खर्चाचा मंजुरीसाठी नव्याने प्रस्ताव राज्यसरकारडे पाठवण्यात आला. या खर्चाला या खर्चाला गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यसरकारने मान्यताही दिली आहे.

मात्र टेंडर निघत नव्हते त्यामुळे दोन वर्षांपासून सिव्हिल रुग्णालयाची सुपरस्पेशालिटी लटकली असल्याचे उघड झाले होते. दरम्यान ठाणेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच टेंडर निघाले असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेंडर उघडले जाणार असून सिव्हिलची लटकलेली सुपर स्पेशालिटी मार्गी लागणार आहे.

ठाण्यातील एकमेव सरकारी शासकीय असलेल्या रुग्णालय सिव्हील रुग्णालयासाठी इंग्रज सरकारच्या काळात विठ्ठल सायन्ना यांनी सरकारला जागा दान केली होती. त्यांच्याच नावे हे रूग्णालय सुरू आहे. या रुग्णालयाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतरणाची चर्चा सुरु आहे.

पर्यायी जागेच्या दीर्घ शोधानंतर अखेर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रुग्णालयातील प्रसूती तसेच नवजात शिशू विभाग, सोनोग्राफी यांसारखे अनेक संवेदनशील विभाग या पर्यायी जागेत हलविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप स्थलांतराला मुहूर्त मिळालेला नाही. काही विभाग नवीन इमारतीत हलवण्यात आला आहे. मात्र बहुतांशी विभाग मनोरुग्णालय परिसरात हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मार्च २०२० पूर्वीच या कामाचे टेंडर निघेल असे सांगण्यात येत होते. मात्र देशात कोरोना महामारीचे आगमन झाले आणि देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. सिव्हिल रुग्णालयात कोव्हीडसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली त्यामुळे नवीन कामाचा विषय मागे पडला. दरम्यान येत्या ५० ते ६० वर्षाचे नियोजन करून नव्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी नव्याने सल्लागार नेमण्यात आला. नियोजित रुग्णालयाच्या आराखड्याला सिव्हिल सर्जन, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सचिव यांची मान्यता घेण्यात आली. या प्रक्रियेला काही वेळ गेला,त्यामुळे निविदा निघण्यास उशीर झाला, असे गेल्यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in