"छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात येणार महाविकास आघाडीची सभा ही वज्रमूठ नाहीतर वज्रझूठ सभा आहे" अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे लोकं फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांची वज्रमुठ नाही, तर वज्रझूठ सभा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारो आंदोलन केले होते. पण आता त्यांचेच पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपमान करणाऱ्या लोकांची गळाभेट घेत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हे फार वेदनादायी आहे" असा टोला त्यांनी यावेळी लगावला.