ठाणे मतदारसंघामुळे बेरजेचे गणित बिघडले; मुख्यमंत्र्यांची ठाणे मतदारसंघासाठी प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी घोषित करताना त्या यादीमध्ये कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा उल्लेख नसल्याने या दोन्ही जागा शिवसेना आणि भाजपमध्ये कळीचा मुद्दा ठरत असल्याची चर्चा होती. ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हा भाजपला हवा आहे, हे लपून राहिलेले नाही.
ठाणे मतदारसंघामुळे बेरजेचे गणित बिघडले; मुख्यमंत्र्यांची ठाणे मतदारसंघासाठी प्रतिष्ठा पणाला

- अतुल जाधव

ठाणे दर्पण

देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असे जाहीर करून एकप्रकारे ठाणे मतदारसंघाबाबत सस्पेन्स वाढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा डोकेदुखी ठरली ठरत आहे. बेरजेचे राजकारण करताना ठाणे मतदारसंघाने महायुतीतील जागावाटपाचे गणित बिघडवले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी घोषित करताना त्या यादीमध्ये कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा उल्लेख नसल्याने या दोन्ही जागा शिवसेना आणि भाजपमध्ये कळीचा मुद्दा ठरत असल्याची चर्चा होती. ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हा भाजपला हवा आहे, हे लपून राहिलेले नाही. यापैकी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, भाजपचे त्यांना पूर्ण समर्थन असेल याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करून कल्याणचे गुपित उघडे केले असले तरी ठाण्याचा पत्ता उघड केला नसल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपची दावेदारी प्रबळ असल्याची बाेलले जात आहे.

ठाण्याची जागा भाजपकडून शिवसेनेकडे आल्यानंतर आनंद दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिल्याप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून प्रकाश परांजपे हे निवडून आले. आनंद दिघे आणि शिवसेनेचा ठाण्यात प्रभाव वाढत असताना प्रकाश परांजपे २००४ ला पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. २००८ ला प्रकाश परांजपे यांचे दुखःद निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे पोटनिवडणुकीत विजयाची परंपरा कायम राखत खासदार झाले. २००९ ला नवी मुंबईचे संजीव नाईक या ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला शिंदे पर्व ठाण्यात सुरू झाले होते. शिवसेनेचे राजन विचारे यांच्या रूपाने पुन्हा एकदा शिवसेनेचा खासदार दिल्लीत दाखल झाला.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. ठाण्यासाठी भाजपचा एक मोठा गट आग्रही असल्याने भाजप देखील ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ ठाण्यात मोडतो. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असण्यातच शिवसेनेचा फायदा आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यकाळातील वाटचालीसाठी ठाणे शिंदे यांच्या ताब्यात असणे खूप गरजेचे आहे. ठाणे मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उत्तम संघटन आहे. ठाणे शहरात असलेले शिवसेना शाखेचे जाळे हीच शिवसेनेची ताकद आहे. याशिवाय नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक यासारखे नेते आणि शिवसेनेची महिला आघाडीची भक्कम फळी यामुळे शिवसेनेची ठाण्यात पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत.

आनंद दिघे यांचा करिश्मा या मतदारसंघात कायम आहे. आनंद दिघे यांनी जो मतदारसंघ भाजपकडून मागून घेतला तो मतदारसंघ भाजपला परत केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचा गड राखण्यास कमी पडले असा संदेश शिवसैनिकांमध्ये पोहचू शकतो. असे झाले तर एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. आनंद दिघे यांचा मतदारसंघ काही करून भाजपला सोडणे एकनाथ शिंदे यांना परवडणार नसल्याने ठाणे शिवसेनेचेच या भूमिकेवर एकनाथ शिंदे ठाम आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ आमदार हे भाजपचे आहेत तर दोन आमदार आहेत शिवसेनेचे. ठाण्यात जेव्हा शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची तसेच सुरू झाली तेव्हा तीन प्रमुख नावांची चर्चा होती. पहिले नाव होते ते नरेश म्हस्के, दुसरे नाव होते रवींद्र फाटक आणि तिसरे प्रताप सरनाईक यांचे मात्र भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय केल्याने ठाण्याचा गड जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील कंबर कसली आहे.

ठाणे मतदारसंघासाठी भाजपचे बळ मजबूत

ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करत आहे, त्यामागे या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास समजून घेतला तर भाजपचे बळे अधिक मजबूत असल्याचे चित्र आहे. १९७७ आणि १९८० या दोन वेळेला जनसंघाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ माळगे या मतदारसंघातून खासदार झाले. १९८४ ला परत भाजपचे जगन्नाथ पाटील हे खासदार झाले. १९८९ आणि १९९१ रामभाऊ कापसे हे याच ठाण्यातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. तडजोडीच्या राजकारणात १९९६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपकडून ठाण्याची जागा मागून घेतली.

मुख्यमंत्री ठाणेकरांना सरप्राइज देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राखणे ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. काही करून ठाणे शिवसेनेकडे राखण्यासाठी मुख्यमंत्री चर्चेतील नावे वगळून नवीनच तगड्या उमेदवाराची घोषणा करून ठाणेकरांना सरप्राइज करण्याच्या विचारात असून विरोधकांना चीतपट करण्यासाठी मुख्यमंत्री धक्कातंत्राचा वापर करत नवीन चेहरा समोर आणणार असल्याची चर्चा ठाण्यात आहे.

logo
marathi.freepressjournal.in