जव्हारमध्ये सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण वाढले

सद्य:स्थितीत पावसाचे दिवस असतानाच अधूनमधून दिवसा उष्णतेत वाढ होत आहे.
जव्हारमध्ये सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण वाढले

गेल्या काही दिवसांपासून जव्हार शहर व ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला आहे. त्यातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे, तर थंड वारेही अधून-मधून सुटत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, डोके दुखणे, ताप येणे, नाकातून पाणी येणे आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे पहायला मिळत आहेत. शासकीय रुग्णालयात दिवसाला तीनशे पेक्षा अधिक रुग्ण तपासणी होत आहे. अशावेळी लहान मुले तसेच वृद्धांची काळजी घेणे गरजेचे असून त्यांना पाणी उकळून पाजावे, असे आवाहन आरोग्य आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत पावसाचे दिवस असतानाच अधूनमधून दिवसा उष्णतेत वाढ होत आहे. पावसाळी वातावरण आणि रखरखते ऊन यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

लहान बालकांना ताप, सर्दी,खोकला असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घेऊन उपचार करावा. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे उपचार करून घेण्यासाठी खासगी व शासकीय दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:बरोबर लहान मुलांची तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. बाजारहट करतेवेळेस गर्दीचे ठिकाण टाळावे. वातावरणातील दूषित विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर केल्यास फायद्याचे ठरणार आहे.

दुर्लक्ष करणे धोक्याचे

ताप आल्यास याबाबत घरचा कोणताही उपाय करू नये. लगेच जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टरांनी दिलेली औषधी वेळेवर घ्यावी. ताप उतरेपर्यंत रोजच्या रोज पाणी उकळून प्यावे. कुटुंबप्रमुखांनी लहान मुले तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.

मागील दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खोकला, सर्दी, ताप, अंग दुखणे, डोके दुखणे, पोट दुखणे,आदी आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे ही साथ पसरत आहे. पालकांनी लहान मुलांची तसेच वृद्ध मंडळींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.ताप किंवा सर्दी हा आजार अंगावर काढू नये. लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

- डॉ. रामदास मराड,

वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in