ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका;कमी तापामानाची नोंद

ठाण्यात शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास शहरात २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका;कमी तापामानाची नोंद

ठाणे: खऱ्या अर्थाने थंडी नोव्हेंबरपासून सुरू होते. मात्र यंदा नोव्हेंबर-डिसेंबर जाऊन जानेवारी उजाडला तरी थंडी जाणवत नसल्यामुळे ठाणेकरांमध्ये निराशा पसरली होती. त्याचबरोबर सकाळी ऊन रात्री ढगाळ वातावरण अशी स्थिती असल्यामुळे आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र जानेवारी महिन्याच्या बुधवारपासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक थंडीचा आस्वाद घेण्यास सज्ज झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शुक्रवारी सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापुरात करण्यात आली. ठाण्यात शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास शहरात २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बदलापुरात १४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. त्या खालोखाल कल्याण, ठाणे या शहरात अनुक्रमे १६.५ आणि १७.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पारा घसल्याने जिल्ह्यात धुकेही पसरल्याचे दिसून आले. त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवला. सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर आणि गुलाबी थंडीचा अनुभव याचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.

गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा आणखी खाली उतरला. शुक्रवारी सकाळी हा पारा २० अंशाच्या आसपास आला होता. सकाळी ६.३० वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे २०.२० अंश तापमानाची नोंद झाली. गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. या रम्य वातावरणामुळे पहाटे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी डिसेंबर महिन्यात बदलापुरात १४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अजूनही थंडीचा तसा कडाका जाणवलेला नाही.

कल्याण शहरात १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ठाणे शहरात १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तापमानात घट झाल्याने ठाणे जिल्ह्याला हुडहुडी भरली होती. शुक्रवारी घटलेल्या तापमानासह हवेतही धुके पसरले होते. त्यामुळे अनेक रस्ते, उंच इमारती धुक्यात गुडूप झाल्या होत्या. धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही काही काळ परिणाम जाणवला. आणखी दोन दिवस अशाच प्रकारी थंडीचे असतील, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

पुन्हा तापमानात वाढ होणार

जिल्ह्यात ही सध्या हुडहुडी वाढू लागली आहे आणि त्याचा परिणाम सगळीकडे जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील थंडी वाढल्याने अनेकांचे कपाटात गेलेले स्वेटर आणि कानटोप्या पुन्हा बाहेर निघू लागले आहेत. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि दक्षिणेतून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे ७ जानेवारीनंतर पुन्हा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येईल. तसेच थंडी काही अंशी कमीही होईल. मात्र मकर संक्रांतीनंतर थंडीसाठी पोषक वातावरण असणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सध्या थंडीबराेबर धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in