पाणीटंचाई जाणविण्याआधीच नियोजन करा! जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश

नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या.
पाणीटंचाई जाणविण्याआधीच नियोजन करा! जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश

ठाणे : येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई जाणविण्याआधीच त्यासंबंधीच्या उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश अत्यंत कठोर शब्दांत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सोमवारी शहापूर येथे आयोजित पाणीटंचाई उपाययोजना आढावासंबंधी बैठकीत दिले.

यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उपअभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून दि. ३१ मार्च रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव-पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन सुरू करण्याबाबत निक्षून सांगितले.

पाणी नाही असे एकही गाव नसावे

नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे, गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठ्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. पाण्याचे टँकर व इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन करावे, असेही ते शेवटी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in