सहयाद्री पर्वत रांगांमध्ये सजले रंगबेरंगी रानफुलांचे कासपठार

ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री जंगलाची सफर करताना ही दुर्मिळ रानफुले आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत
सहयाद्री पर्वत रांगांमध्ये सजले रंगबेरंगी रानफुलांचे कासपठार

सातारा, महाबळेश्वरातील प्रसिध्द कास पठारासारखे विविध रंगबेरंगी रान फुलांनी सध्या ठाणे जिल्हयातील सह्याद्री पर्वतरांगांचे डोंगरमाथे फुलून गेले आहेत. पावसाळी मोसमात मोहून टाकणारी ही रानफुले पाहण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. माहुली गड,आजोबापर्वत, हरिश्चंद्र गड, माळशेज घाटाच्या डोंगरावरून निसर्गाने आपल्या सौंदर्याची उधळण केली आहे. ही फुले पाहण्यासाठी हौशी पर्यटकांनी डोंगरमाथ्यांवर गर्दी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री जंगलाची सफर करताना ही दुर्मिळ रानफुले आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. जंगलात,डोंगर माथ्यावर रानभेंडी, पेवा, तेरडा, रान कर्दळ, लाल भुछत्र, गौरी, पानलीली, वाघचोरा, सीतेची वेणी, द्रोपदी, पुष्प, दुपारी फुल, टेटुचे फुल, गौरीचे फुले, बहावा, सोनकी, कोंबडा, कृष्ण कावळी, कारवीचे फुले, पुंगळी, म्हातारी अशी वेगवेगळी नावे असलेली ही रानफुले नजरेस पडू लागली आहेत. हिरव्यागार गवतांच्या झाडीझुडपात शेकडोच्या संख्येने डोकावणारी लाल, पिवळी, गुलाबी, निळ्या,जांभळ्या, पांढऱ्या रंगाची बहरलेली ही फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारे फुलपांखरांचे थवे, लहान-मोठे चतूर लक्ष वेधून घेत आहेत.

डोळ्यांचे पारणे फेडणारे हे अनोखे दृश्य पावसाळ्यातील श्रावण महिन्यात तुम्हाला पाहण्यास मिळतील. याकरिता तुम्हाला शहापूर तालुक्यातील हिरव्यागार सहयाद्री पर्वत रांगांमधील जंगलाची सफर करावी लागेल,असे हे रानफुलांचे अनोखे सौंदर्य आहे. शहापूर व मुरबाडच्या जंगलाची सैर करताना रस्त्याच्या कडेला ही रानफुले जसी काय आपल्या स्वागतासाठी मोठ्या दिमाखाने उभी असलेली पहायला मिळतात. या रानफुलांचे नैसर्गिक सौंदर्य जवळून पाहण्यासाठी आणि या फुलांचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकार व निसर्गप्रेमींची पाऊले शहापूर,व मुरबाडच्या जंगलाकडे वळली आहेत.

हिरवीगार शाल परिधान केलेल्या डोंगर माथ्यावर दिसणारे हे पावसाळ्यातील रानफुलांचे देखणेपण कोणीही पावसाळ्या मोसमामध्ये मिस करूच शकत नाही. या रानफुलांच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत, असे हे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडते. खास पावसाळ्यात फुलांचे हे शहापूरच्या जंगलातील विश्व सध्या येथे नव्या कास पठाराची आठवण करून देत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in