वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३० होर्डिंग्जवर कारवाई; आयुक्तांच्या या कारवाईचे जागरूक नागरिकांकडून स्वागत

आयुक्त संजय काटकर यांच्या निदर्शनास सदर नियमबाह्य होर्डिंग परवानग्यांची बाब येताच त्यांनी त्याचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे आतापर्यंत सदर नियमबाह्य होर्डिंग ना परवानगी आणि संरक्षण देणाऱ्या महापालिका अधिकऱ्यांना अखेर नाइलाजाने का होईना आदित्य या ठेकेदाराच्या सुमारे ३० लोखंडी होर्डिंग्ज तोडून काढून टाकण्याची कारवाई करण्याची पाळी आली
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३० होर्डिंग्जवर कारवाई; आयुक्तांच्या या कारवाईचे जागरूक नागरिकांकडून स्वागत
Published on

भाईंंदर : जाहिरात फलक नियंत्रण नियमांचे उल्लंघन करून ठेकेदाराच्या संगनमताने काही पालिका अधिकाऱ्यांनीच दिलेले नियमबाह्य होर्डिंग परवानगीची आयुक्त संजय काटकर यांनी गंभीर दखल घेत एका ठेकेदाराचे रस्ता-पदपथ व वाहतुकीस अडथळा ठरणारे सुमारे ३० लोखंडी होर्डिंग काढून टाकायला लावले आहेत. आयुक्तांच्या या कारवाईचे जागरूक नागरिकांसह अनेक राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.

२००३ साली मंजूर असलेल्या जाहिरात फलक नियंत्रण नियमानुसार रस्ता, पदपथ वर तसेच वाहने चालवताना चालकांचे लक्ष विचलित होईल असे ठिकाणी होर्डिंग उभारण्यास मनाई होती. होर्डिंगचा आकार देखील ४० बाय २० फूट इतका मर्यादित होता. उच्च वीजवाहक तारांचे खांब, सीआरझेड क्षेत्रात सुद्धा होर्डिंग ना मनाई आहे. तसे असताना महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि एका राजकीय नेत्याशी संगनमत करून नियमबाह्यपणे होर्डिंग परवानग्या दिल्याने त्यावर कारवाई करा असे आरोप सातत्याने होत होते.

त्यातच स्वातंत्र्य वीर सावरकर चौक अर्थात गोल्डन नेस्ट सर्कल येथील होर्डिंग तर एका वादग्रस्त नेत्यास आंदण दिल्याचा आरोप होत होता. आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांनी होर्डिंग ठेकेदाराचा ठेका रद्द करून बेकायदा होर्डिंग काढून टाकण्याची मागणी चालवली होती. जाहिरात फलक नियम २००३ व नंतर आलेल्या नियम २०२२ नुसार नियमबाह्य होर्डिंग परवानग्या रद्द कराव्या, याबाबत सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता आदींनी तक्रारी चालवल्या होत्या.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

आयुक्त संजय काटकर यांच्या निदर्शनास सदर नियमबाह्य होर्डिंग परवानग्यांची बाब येताच त्यांनी त्याचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे आतापर्यंत सदर नियमबाह्य होर्डिंग ना परवानगी आणि संरक्षण देणाऱ्या महापालिका अधिकऱ्यांना अखेर नाइलाजाने का होईना आदित्य या ठेकेदाराच्या सुमारे ३० लोखंडी होर्डिंग्ज तोडून काढून टाकण्याची कारवाई करण्याची पाळी आली. दरम्यान नियमबाह्य होर्डिंग्ज परवानगी व त्याला सतत संरक्षण ठेवून ठेकेदारासह त्यावरील जाहिरातदारांचा फायदा करून देणाऱ्या जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित उपायुक्त यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह प्रशासकीय व फौजदारी कारवाई करून तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in