
राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयस्तरावरील नियोजन आढावा समित्यांच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार सोमवारी जव्हार प्रकल्पाचे नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष कॅंग्रेसचे युवानेते सचिन शिंगडा हे ॲक्शन मोड मध्ये येत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथे हजर झाले. यावेळी त्यांचे स्वागत सहायक प्रकल्प अधिकारी विजय मोरे यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्या अंतर्गत मोखाडा, विक्रमगड, वाडा अशा चार तालुक्यांचा समावेश होत असून या तालुक्यातील प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत प्रकल्प कार्यालयाच्या योजना पोहोचवणे हे आपले कर्तव्य असणार आहे, अशी भावना शिंगडा यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आदिवासी विकास विभागच नाही तर शिक्षण विभाग, महसूल विभाग या सर्वांचा एकत्रित वापर करून शासकीय याेजना तळागाळापर्यंत नेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सचिन शिंगडा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जव्हार शहर अध्यक्ष फक्रुद्दीन मुल्ला अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद पटेल जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार, मोखाडा तालुका अध्यक्ष प्रकाश धोडी, विशाल पडघान, दीपक भिसे, किशोर जाधव, अविनाश पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. जव्हार शहरात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला व त्यानंतर साकीनाका येथील बिरसा मुंडा चौक येथे अभिवादन केले.