उल्हासनगरमध्ये पोटगीसाठी पतीच्या अपहरणाचा कट; पत्नीच्या कुटुंबीयांनीच रचले षडयंत्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे, जिथे पोटगी रकमेची मागणी पूर्ण न केल्यामुळे एका पतीचे अपहरण करण्यात आले. पत्नीच्या कुटुंबीयांनी रचलेल्या या धक्कादायक कटामुळे उल्हासनगर शहरात खळबळ उडाली असून, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार राजेश रोहिडा (४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जून रोजी ते साखर आणण्याच्या उद्देशाने बाजारात गेले असता अचानक राजेश यांच्या मेहुण्याने त्यांना अडवून जबरदस्तीने एका वॅगनार कारमध्ये ओढून घेतले. त्यानंतर राजेश यांना पोटगीची रक्कम वाढविण्याबाबत धमकावले जात होते. राजेश यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांकडून त्यांना पोटगीची रक्कम १५ लाखांवरून २० लाख करण्यासाठी धमकावले जात होते. मात्र प्रत्यक्षात पोटगीची रक्कम आधीच २.५ लाखांवर ठरविण्यात आली होती. या अनियमित पोटगीसाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकला जात असल्याचे राजेश यांनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणात राजेशच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी त्याचे अपहरण करून एका निर्जन ठिकाणी नेले. त्याला एका मोडकळीस आलेल्या घरात कैद करून ठेवण्यात आले होते, जिथे दोन लोक त्याच्या देखरेखीसाठी नेमले होते. त्याला सतत जीवघेण्या धमक्या दिल्या जात होत्या, की जर त्याने पोटगी रक्कम वाढवली नाही, तर त्याला ठार मारले जाईल, अशी धमकी दिली जात असे.

जवळपास अडीच महिन्यांच्या नजरकैदेत असलेल्या राजेश यांनी अखेर २८ सप्टेंबर रोजी पळ काढला आणि पोलिसांकडे धाव घेतली. शनिवारी त्यांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारीच्या आधारे, पत्नी, तिचा भाऊ आणि इतर चार नातेवाईकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात अपहरण, खंडणीसाठी धमकी देणे आणि शारीरिक इजा करण्याचे गुन्हे समाविष्ट आहेत. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, पण सध्या या घटनेमुळे रोहिडा कुटुंबीय तसेच त्यांची पत्नी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उल्हासनगरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

पत्नीकडून तक्रार दाखल

आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबीयांनी हा कट रचला होता. मात्र, या प्रकरणातील सर्व तथ्यांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, त्याच्या पत्नीने २०१३ मध्येच पतीविरुद्ध छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in