भाजप-शिंदे गटात कंटेनर वाद, केळकर यांची कारवाईची मागणी तर सरनाईक यांचे भाजपला प्रत्युत्तर

घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे.
भाजप-शिंदे गटात कंटेनर वाद, केळकर यांची कारवाईची मागणी तर सरनाईक यांचे भाजपला प्रत्युत्तर
Published on

ठाणे : घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे. हा कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्याशेजारीच प्रतीकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशारा केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. भाजपच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाई यांनी भाजपला प्रत्युत्तर देत कंटेनर शाखा म्हणजे अनधिकृत बांधकाम नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतरच याबाबत विचार केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे ठाण्यात सध्या भाजप-शिंदे गटात कंटेनर वाद सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कंटेनर शाखा ठाण्यातील शिवाई नगर, मनोरमानगर, मुंब्रा आणि भाईंदर येथे देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या दोघांच्या वादात पालिका आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे भांडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर केला आहे. शहरातील विविध भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आ. संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये, अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आ. केळकर यांनी बजावले. धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आ. केळकर यांनी सचित्र दाखवले. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही याठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले.

दोन प्रतीकात्मक कार्यालये थाटणार

महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवरी रोजी याठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून २७ जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तात्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचे आ. केळकर यांनी सांगितले. दरम्यान, राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी? तेव्हा, तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतीकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आ. केळकर यांनी दिला आहे.

कंटेनर शाखा म्हणजे अनधिकृत बांधकाम नव्हे

ठाणे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा उभारण्यावरून एकीकडे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला (शिंदे गट) टार्गेट केले असताना आता शिवसेनेच्या आमदारांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. कंटेनर शाखा या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी उभारल्या जातात. कंटेनर शाखा म्हणजे अनधिकृत बांधकाम नसल्याचे प्रत्युत्तर आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. जर ही शाखा आरक्षित भूखंडावर असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल, मात्र नागरिकांना त्रास होत असेल आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या तरच शाखा काढू, अशी भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in