
ठाणे : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिशानिर्देशांचे तंतोतंत पालन करत पीओपी मूर्तीची निर्मिती, विक्री तसेच विसर्जन यावर राज्यभर बंदीबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असताना या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने राज्य सरकार आणि राज्यातील महापालिकांकडून उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा अवमान करण्यात आला आहे. याविरोधात आता राज्य सरकार आणि राज्यातील महापालिकांच्या विरोधात उच्च न्यालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञ आणि याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली आहे.
माघी गणेशोत्सवदरम्यान दीड दिवसाचे व पाच दिवसाचे पीओपी मूर्तींचे विसर्जन मुंबई महानगर प्रदेशातील तलावात, खाडीपात्रात, समुद्रात झाल्याचे पुरावे गोळा करून राज्य सरकार, पर्यावरण मंत्रालय, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त यांना पाठविले आहेत. मात्र अजूनही एकाही गुन्ह्याची नोंद एकही महानगरपालिकेने केलेली नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन्ही आदेशाचा राज्यभर अवमान झाला तरीही एकाही मंडळावर कारवाई झालेली नाही. राज्यातील सर्व महापालिकांना पीओपी मूर्तींवर कारवाई करण्यासाठी पुरेसा अवधी असूनदेखील राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास कचरत असल्याचे याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे. हमरापुर, जोहे या ठिकाणी लाखो पीओपी मूर्ती घडविल्या जातात, अशी माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली आहे.