ठाण्यात ‘क्रेडाई-एमसीएचआय’चे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन; बाळकूम येथील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’मध्ये आयोजन

ठाणेकरांना घर व व्यावसायिक मालमत्ता खरेदीसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ तर्फे यंदाचे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
ठाण्यात ‘क्रेडाई-एमसीएचआय’चे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन; बाळकूम येथील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’मध्ये आयोजन
Published on

ठाणे : ठाणेकरांना घर व व्यावसायिक मालमत्ता खरेदीसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ तर्फे यंदाचे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘एमसीएचआय है तो भरोसा है’ या टॅगलाईनसह होणारे हे प्रदर्शन ठाणे पश्चिम येथील बाळकूममधील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत भरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रदर्शनात शेकडो निवासी व वाणिज्य प्रकल्प एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. ग्राहकांना आपल्या पसंतीची मालमत्ता निवडण्याची संधी मिळणार असून गृहकर्जासाठी आघाडीच्या बँका व खासगी वित्तीय संस्थांची दालनेही प्रदर्शनात असतील.

या पत्रकार परिषदेला गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समिती अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा, युवा शाखा अध्यक्ष निमित मेहता यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या २२ वर्षांत ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनांतून हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून अनेक व्यावसायिकांनी वाणिज्य मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे “एमसीएचआय है तो भरोसा है” हा विश्वास ठाणेकरांनी व्यक्त केल्याचे मिराणी म्हणाले.

रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी उत्तम संधी

ठाणे शहरातील वेगवान शहरीकरण, आधुनिक जीवनशैलीचे गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांचा विकास आणि आगामी मेट्रो प्रकल्प लक्षात घेता मालमत्तेत गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने घरखरेदीदारांसोबत गुंतवणूकदारांनीही प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. प्रदर्शनात केवळ मालमत्ता प्रकल्पच नव्हे, तर गृहसजावट, अंतर्गत रचना, सरकारी धोरणे, ‘महारेरा’ कायद्यातील तरतुदी याबाबत माहितीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. कुटुंबांसाठी विविध उपक्रम आणि मार्गदर्शन सत्रेही ठेवण्यात आली आहेत.

‘ठाणे व्हिजन २०३०’ची घोषणा

यावेळी अध्यक्ष सचिन मिराणी यांनी ‘ठाणे व्हिजन २०३०’ची घोषणाही केली. यामध्ये पर्यावरणपूरक विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वत शहरीकरण, डिजिटल प्रशासन आणि आर्थिक प्रगती यांवर भर देण्यात येणार आहे. २०३० पर्यंत ठाण्याची अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रॉपर्टी प्रदर्शनानिमित्त ‘चलो ठाणे’ हे ठाण्याच्या विकासाचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारे अभिमान गीतही सादर करण्यात आले. “आज के जमाने में, क्या नही है ठाणे में” या गीतातून ठाण्याचा सर्वांगीण विकास अधोरेखित करण्यात आला आहे.

प्रॉपर्टी प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये

  • एकाच ठिकाणी घर व वाणिज्य मालमत्ता खरेदीची संधी

  • प्रसिद्ध बिल्डर व आर्थिक सल्लागारांशी थेट संपर्क

  • आघाडीच्या बँका व वित्तीय संस्थांची उपस्थिती

  • मोफत प्रवेश व वातानुकूलित हॉल

  • आनंद सिनेमा, ठाणे (पूर्व) येथून मोफत बस सेवा

  • व्हॅलेट व मोफत पार्किंग सुविधा

पूर्वनोंदणी: www.credaimchi.com

logo
marathi.freepressjournal.in