हिंदू स्मशानभूमीत मेलेले मांजर जाळल्याने गुन्हा ;पालिकेच्या ठेका कर्मचाऱ्यावर कारवाई

भाईंदर पश्चिम येथे महापालिका प्रभाग २३ मधील भाईंदर पश्चिम आंबेडकर नगर स्मशानभूमीत हिंदू धर्मानुसार अंतिम क्रियाकर्म केले जातात
हिंदू स्मशानभूमीत मेलेले मांजर जाळल्याने गुन्हा ;पालिकेच्या ठेका कर्मचाऱ्यावर कारवाई

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत आंबेडकर नगर येथे मयत मांजरावर महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता किंवा त्यांना न कळवता परस्पर ठेका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चितेवर अंत्यसंस्कार केल्याने पालिकेने जबाबदारी निश्चित करत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिम येथे महापालिका प्रभाग २३ मधील भाईंदर पश्चिम आंबेडकर नगर स्मशानभूमीत हिंदू धर्मानुसार अंतिम क्रियाकर्म केले जातात. त्याठिकाणी महापालिकेतर्फे बबन थुळे, ठेका कर्मचारी-ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, हनुमान चव्हाण, ठेका कर्मचारी शाईन मेंटेनन्स व मिराज अली, ठेका कर्मचारी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी यांना नेमून देण्यात आले असून, ते तीन पाळीमध्ये काम करतात. तसेच निलेश पाटील, ठेका कर्मचारी- वन विभाग यांस देखील त्यांच्यासोबत नेमून देण्यात आले आहे. पालिका ठेका कर्मचाऱ्यांनी मिळून संगनमताने लोखंडी शेगडीवर मयत मांजराचे दहन केल्याची माहिती मिळाली.

मे. पेट हेवन्स या संस्थेचे जितेश पटेल, पारुल पटेल यांनी मृत मांजर प्राण्यास स्मशानभूमीत दहन करण्यास घेऊन आले होते. त्यावेळी हिंदू स्मशानभूमीत ठेका कर्मचारी बबन थुळे, हनुमान चव्हाण, मिराज अली व वन कर्मचारी निलेश पाटील यांनी ज्या ठिकाणी हिंदू धर्मीय मनुष्याचे दहन केले जाते, त्या लोखंडी शेगडीवर मयत मांजराचे दहन केले होते.

उपायुक्त रवी पवार यांच्या आदेशानुसार लेखी जबाबदार कर्मचारी यांची निश्चिती करून आरोपी पालिकेचे ठेका कर्मचारी बबन थुळे, हनुमान चव्हाण, मिराज अली व वन कर्मचारी निलेश पाटील तसेच मे. पेंट हेवन्स संस्थेचे मयत मांजर घेऊन गेलेले जितेश पटेल, पारुल पटेलविरोधात प्रभारी उपमुख्य स्वच्छता अधिकारी अरविंद चाळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in