गुन्हेगारी डोके वर काढतेय; सुसंस्कृत ठाण्यात दिवाळीपूर्वीच उडाले गोळीबाराचे डबल बार

पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने ठाण्याची शांतता धोक्यात आल्याची भावना ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे.
गुन्हेगारी डोके वर काढतेय; सुसंस्कृत ठाण्यात दिवाळीपूर्वीच उडाले गोळीबाराचे डबल बार

ठाणे शहर राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील राजकारणात या शहराचा दबदबा चांगलाच वाढला आहे, असे असले तरी गेल्याकाही वर्षात गुन्हेगारी टोळ्या थंडावल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र काही किरकोळ घटना वगळता मोठ्या गुन्हेगारी कारवाया ऐकिवात नव्हत्या. मात्र त्याचवेळी सोनसाखळी चोरी, दरोडे, घरफोड्या यात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तर कोरोनाकाळापासून ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांनी कळस गाठला आहे. यातच दिवाळीच्या सणाच्या आधीच या सांस्कृतिक नगरीत एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आणि संपुर्ण ठाणे शहर हादरले. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक इसम जखमी आहे. विशेष म्हणजे गोळीबारात मृत्यू झालेल्या गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २३ गंभीर गुन्हे दाखल असून शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईला हलवण्यात येत असताना शववाहिकेवर त्याच्या समर्थकांनी दगडफेक करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने ठाण्याची शांतता धोक्यात आल्याची भावना ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे.

कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर, आनंद नगर, गणपत पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोणेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर या सर्वच परिसर बेकायदा झोपडपट्‌ट्यांनी व्यापलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे वन विभागाच्या ताब्यात असलेला पारसिक डोंगर बेकायदा झोपड्यांनी पूर्णपणे वेढलेला असून या परिसरात जागा बळकावून झोपड्या बांधणे आणि त्या विकणे या कामात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी दादा आणि गुंड टोळ्या सक्रिय आहेत. विशेष म्हणजे या बेकायदा झोपडपट्‌ट्यांमध्ये अनैतिक धंदे खुलेआम चालतात. हे धंदे चालवणारे समाजकंटक आणि गुन्हेगारांचा वावर सदैव या परिसरात असल्यामुळे सतत गंभीर गुन्हे घडत असतात. त्यामुळे या परिसरात रहाणाऱ्या सर्वसामान्य माणसाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.

निसर्गाचे कोंदण लाभलेला ठाण्याचा तलावपाळी परिसर,पहाटेपासून ते अगदी मध्यरात्री पर्यंत या ठिकाणी मोठी वर्दळ असते, या परिसरात जसा प्रेमी युगुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. तशीच चौपाटी म्हणून नवी ओळख लाभलेल्या या परिसरात अबालवृध्द आणि कुटुंबासह फिरायला येणाऱ्यांचीही मोठी गर्दी असते. याच परिसरात भर रस्त्यात एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भर रस्त्यात कुटुंबाच्या समोर महिलेचा विनयभंग झाल्यामुळे ठाण्यात महिला किती सुरक्षित आहेत, यावरही सणसणीत प्रकाश पडला आहे. ठाणे शहराची ओळख सांस्कृतिक उपराजधानी अशी आहे. परंतू गेल्याकाही वर्षातही ओळख धूसर होवू लागली आहे.

रिक्षातून जाणाऱ्या महिला तर सुरक्षित नाहीतच मात्र शहरात एकमेव पर्यटन स्थळ असणाऱ्या तलावपाळी परिसरात आपल्या कुटुंबासह फिरणाऱ्या महिलाही सुरक्षित नसल्याचे खळबळजनक वास्तव उघडकीस आले आहे. गेल्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करत तिला एका रिक्षावाल्याने फरफटत नेले होते त्या प्रकारानेही मोठी खळबळ उडाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in