महापालिकेवर सायबर हल्ला? वेबसाईटवर 'YOU HAVE BEEN HACKED' चा संदेश झळकला!

उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर शनिवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. वेबसाइटच्या डॅशबोर्डवर “ALLAH HU AKBAR - YOU HAVE BEEN HACKED” असा मजकूर झळकला आणि काही काळासाठी प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
महापालिकेवर सायबर हल्ला? वेबसाईटवर 'YOU HAVE BEEN HACKED' चा संदेश झळकला!
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर शनिवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. वेबसाइटच्या डॅशबोर्डवर “ALLAH HU AKBAR - YOU HAVE BEEN HACKED” असा मजकूर झळकला आणि काही काळासाठी प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणात पाकिस्तानी हॅकर्सचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पालिकेच्या आयटी टीमने तत्काळ प्रतिक्रिया देत सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला आहे.

शनिवारी दुपारी सुमारे १.३० वाजता उल्हासनगर महापालिकेच्या वेबसाईटवर अनधिकृत प्रवेश झाल्याची चिन्हे दिसून आली. या वेळेस वेबसाइटवर एक भडक संदेश झळकत होता, ज्यामध्ये धार्मिक घोषणा आणि ‘YOU HAVE BEEN HACKED’ असा मजकूर स्पष्टपणे लिहिला होता. ही बाब महापालिकेच्या आयटी विभागाच्या प्रमुख श्रद्धा बाविस्कर यांच्या निदर्शनास आली आणि तातडीने आयुक्त मनीषा आव्हाळे यांना याची माहिती देण्यात आली.

उल्हासनगर पालिकेच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याचा प्रकार गंभीर असून, आमच्या आयटी विभागाने तत्काळ कृती करत तो प्रयत्न निष्फळ केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीची वाट पाहावी. सायबर सुरक्षेबाबत महापालिका पूर्ण सज्ज आहे. - मनीषा आव्हाळे, (आयुक्त, उल्हासनगर महापालिका)

आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेची टेक्निकल टीम सजग झाली. वेबसाईट ऑफलाइन केली गेली असून सध्या संपूर्ण तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॅकिंगचा हा प्रयत्न परकीय सायबर गुन्हेगारी गटांकडून (विशेषतः पाकिस्तानी हॅकर्स) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी सांगितले की, “महापालिकेच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न झाला आहे, वेबसाइट तात्पुरती बंद करण्यात आली असून टेक्निकल टीम तपास करत आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.”

उल्हासनगर महापालिकेने यासंदर्भात जनजागृती करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अज्ञात वेबसाईट्सवर माहिती देऊ नये, किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणावरून हे स्पष्ट होते की, सायबर हल्ले ही भविष्यातील महत्त्वाची सुरक्षा आव्हाने ठरणार आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांचीही जागरूकता तितकीच आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in