भाईंंदर : दहिसर टोलनाक्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी टोलनाका २ किलोमीटर पुढे, मीरारोडवरील वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई प्रवेशद्वारावरील ५ टोलनाक्यांवर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासगी वाहनांचा टोल माफ केला होता. त्यानंतर काही प्रमाणात कोंडी कमी झाली, परंतु वाहनांची संख्या वाढल्याने दहिसर टोलनाक्याजवळ गर्दीच्या वेळेत लांबलचक रांगा लागतात. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा अपव्यय होतो, तसेच वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण आणि आरोग्याला हानी पोहचत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.
दहिसर टोलनाक्यावरील वाहतूककोंडीमुळे मीरा-भाईंदरचे नागरिक, वाहनचालक आणि मुंबईकडे जाणारे प्रवासी यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी टोलनाका पुढे नेण्याची मागणी मंत्री सरनाईक यांनी केली होती. टोलनाका स्थलांतर झाल्यास नागरिकांचा प्रवास वेळ कमी होईल, इंधन बचत होईल आणि पर्यावरणीय प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
दोन मार्गिका आणि एक टोल बूथ
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, टोल नाक्यावर फक्त दोन मार्गिका आणि एक टोल बूथ ठेवून उर्वरित रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर वाहतूक समस्या देखील सोडवणार
पेणकरपाडा-ठाकूर मॉल येथील जुन्या सिग्नलजवळ देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी योग्य वाहतूक नियोजन आणि खड्डेमुक्ती करण्यासाठी लवकरच पाहणी करून आधीच्या आदेशांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.