उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या काळात 'लाडका डान्स बार' होता, असा आरोप केल्यानंतर उल्हासनगरातील डान्स बारच्या वास्तवावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या आरोपांमुळे उल्हासनगरातील डान्स बारबद्दल नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला आहे. उल्हासनगरमध्ये आजही ६ ते ७ डान्सबार विनादिक्कतपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे डान्स बार केवळ आर्थिक लाभ मिळविण्यासाठी चालवले जात असून, त्यांच्यावर प्रशासनाने ज्या कारवाई केल्या आहेत, त्या केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विरोधकांकडून 'लाडका शेतकरी योजना' वर टीका करण्यात आल्यावर, मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार प्रत्युत्तर देत, त्यांच्या काळात 'लाडका डान्स बार' होता, असा गंभीर आरोप केला होता. पण त्याच वेळी उल्हासनगरात आजही मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू आहेत, हे वास्तव लक्षात घेऊन आता शिंदे यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामध्ये काही डान्स बारवर कारवाई झाली असली, तरी ती केवळ तात्पुरती आणि दिखाऊ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काही डान्स बारवर कारवाई केली आहे. चांदणी, राखी, ॲपल, वर्षा अशा काही निवडक डान्स बारवर तोडक कारवाई करण्यात आली, परंतु अजूनही शहरात अनेक डान्सबार, जसे की पॅराडाईज, आशियाना, आचल पॅलेस, नाईंटी डिग्री, हँड्रेड डेज, पेनिन्सुला हे पूर्वीप्रमाणेच चालूच आहेत. विशेष म्हणजे, हे डान्स बार पोलीस ठाण्याच्या
अगदी जवळ असूनही, तिथे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या छमछमवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उल्हासनगर महापालिकेच्या दिखाऊ कारवाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे डान्स बार केवळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, तरुणाईवर वाईट परिणाम करणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जातात. या डान्स बारमुळे तरुणांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाच्या पुढील कृतीवर लक्ष
उल्हासनगरातील हे 'लाडके डान्स बार' कधी बंद होणार? आणि प्रशासनाच्या दिशेने कोणती ठोस कारवाई होणार ? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून राहिला आहे. हे प्रश्न प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. शहरातील नागरिक या डान्स बारच्या विरोधात ठाम भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत, आणि प्रशासनाच्या पुढील कृतीवर त्यांचे लक्ष आहे.