
ठाणे : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत १६ हून अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या सोसायटीच्या जागेत परवानगीविना उभारलेल्या होर्डिंगची टांगती तलवार कायम असल्याने रहिवासी धास्तावले आहेत. अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा उत्तुंग होर्डिंग कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगीचे सर्व निकष डावलून उभारलेला मंगल पब्लिसिटीचा हा उत्तुंग होर्डिंग हटवण्याचे निर्देश न्यायालयानेही दिले होते. तरीही, कुठलीच कारवाई होत नसल्याने ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन अमंगल होण्याची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, होर्डिंगच्या मालकाचे ठामपा आणि पोलिसांसोबत देखील आर्थिक लागेबांधे असल्याने होर्डिंगला अभय दिल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. तेव्हा, हा अनधिकृत होर्डिंग तत्काळ हटवून संबधितांची लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सोसायटीने निवेदनाद्वारे केली आहे.
ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या सर्व्हिस रोडवर धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने उभारलेली आनंद कवच को. ऑप. हौसिंग सोसा. लि. शाहू नगर, सोसायटी आहे. या सोसायटीच्या जागेत राहुल शिर्के यांच्या मंगल पब्लिसिटीने ठाणे महापालिकेकडे खोटी कागदपत्रे सादर करून २०१८ साली ८० फूट x १०० फूट व ९० ते ९५ फुटांपेक्षा उंच असे दोन जाहिरात फलक उभारले आहेत. या अनधिकृत होर्डिंगबाबत सोसायटीने स्थानिक नगरसेवक, प्रशासन तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. होर्डिंगबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणामुळे रहिवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या जाहिरात फलकाला लागून अनेक घरे असल्यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हे बेकायदा होर्डिंग हटविण्यासाठी सोसायटीचा अविरत लढा सुरू आहे. परंतु, ठामपाचे अधिकारी काहीच दखल घेत नाहीत, एकप्रकारे ठामपा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. मध्यंतरी ठामपाकडे अर्ज केला म्हणून राहुल शिर्के यांनी सोसायटीच्या रहिवाशांना नाहक त्रास देण्याकरिता ठाणे कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता. परंतु कोर्टानेही शिर्केविरोधात निर्णय देत होर्डिंग उभारण्याचा कसलाही अधिकार नसल्याचा निकाल दि. ४ मार्च २०२४ रोजी दिला. ही बाब महापालिका व स्थानिक राबोडी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून देऊन देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना साकडे
रहिवाशांची वाट या होर्डिंगमुळे बंद झाली आहे, त्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. होर्डिंग प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय रहिवासी व्यक्त करीत आहेत. तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्याची मागणी सोसायटीने केली असून न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहेत.