कळवा पुलाच्या कामासाठी तारीख पे तारीख अजूनही सुरू

ऑगस्ट महिन्यात कळवा सीलिंक वाहतुकीसाठी खुला होईल दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता
कळवा पुलाच्या कामासाठी तारीख पे तारीख अजूनही सुरू

कळवा खाडीवर २.२ किमी लांबीचा पूल बांधण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. २०१४ साली सुरू झालेल्या या पुलाचे काम २०१७ साली पूर्ण व्हायला हवे होते मात्र त्यानंतर पाच वर्षे होऊन गेले तरी तारीख पे तारीख अजूनही सुरू आहे.

आधी मार्च २०१८ त्यानंतर सप्टेंबर २०१९ नंतर डिसेंबर २०१९ नंतर २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात कळवा सीलिंक वाहतुकीसाठी खुला होईल दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र एक वर्ष पूर्ण होऊन यंदाचा सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही.

दरम्यान आयुक्त विपीन शर्मा यांनी स्वतः यंदाच्या मार्च महिन्यात किमान मे २०२२ मध्ये एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यालाही दोन महिने होऊन गेले तरी सुरू झाली नाही. नंतर ऑगस्ट अखेर या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले होते ते आदेशही कागदावर राहिले आहेत.

कळवा गाव आणि ठाणे शहराला जोडण्यासाठी इंग्रज सरकारने १८६३ साली पूल बांधला होता. परंतू तो आता दुरूस्ती पलिकडे गेला आहे. इंग्रज सरकारने बांधलेला तो ब्रिज आता हेरीटेज घोषीत करण्यात आला असून त्या पुलावरून सर्व वाहतूक चार वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. या ब्रिजला समांतर नवा पूल १९९५ साली बांधण्यात आला. मात्र नव्या पुलावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत या पुलावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवासी आणि वाहनचालक यांचा त्रास बराच वाढला आहे. दरम्यान याच नवीन कळवा पुलाशेजारी साकेत कडील बाजूस नवा अतिरिक्त पूल बांधण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

१८१ कोटी रूपये खर्चाचा हा सिलिंक तीन वर्षात पूर्ण करण्याचे सुरुवातीचे नियोजन होते. मात्र यापूलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून तो कधी सुरू होईल हे कोणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in