मोखाडा : मध्य वैतरणा धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे सावर्डे गावच्या लोखंडी पुलावरून जात असताना भास्कर पादीर आणि रुचिका पवार ही दोघे जोरदार प्रवाहाबरोबर वाहून चालली होती. यावेळी पुलाजवळ उपस्थित नागरिकांनी रुचिकाला वाचवले. मात्र भास्कर पाटील यांना आपला तोल सांभाळता न आल्यामुळे ते पाण्याबरोबर वाहत गेले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भास्कर पादीर यांचा मृतदेह मोडकसागर पात्राजवळ सापडला आहे.
मध्य वैतरणा धरणातून शनिवारी पाचही दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तथापी अशा प्रकारे विसर्ग होणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना सावर्डे, दापूरे आणि सावरखुट येथील ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे रिकाम्या पात्रातून निर्धास्तपणे रहदारी सुरू होती. परंतु ऐन मध्यावर पोहोचल्यावर मोठा जलस्रोत आल्याने पादीर यांना सावरायला वेळच मिळाला नाही.