शस्त्रक्रियेनंतर कर्जतमधील १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव? संतप्त जमावाने रुग्णालयाची केली तोडफोड

रोहितच्या मृत्यूबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेनंतर कर्जतमधील १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव? संतप्त जमावाने रुग्णालयाची केली तोडफोड

कर्जत : दहावीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या रोहित गवळी या विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत होते. त्याचे निदान अपेन्डिस निघाल्याने डिकसळ येथील रायगड रुग्णालयामध्ये गवळी कुटुंबाने उपचार घेण्याचे ठरवले. मात्र शस्त्रक्रिया होण्याअगोदर हसतखेळत असलेला रोहित शस्त्रक्रियेनंतर मृत्युमुखी पडला.

रायगड रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी करत संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. रोहितच्या मृत्यूबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील मौजे मानिवली येथे गवळी कुटुंब राहते. रोहित भगवान गवळी (वय १६) हा विद्यार्थी असून १ मार्च रोजी होणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या पेपरची तयारी तो करत होता. अशात त्याच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता त्याला अपेन्डिस असल्याचे निष्पन्न झाला. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्या घरच्यांनी त्याला कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ गावातील रायगड रुग्णालयात दाखल केले. रोहित याला अपेन्डिस निदान झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया गरजेची होती.

डॉक्टरांनी साधारण दुपारचे तीन वाजण्याच्या सुमारास रोहित गवळीवर शस्त्रक्रिया केली, मात्र रोहितला आतमध्ये ठेवत पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले. तद्नंतर रुग्णालयाकडून रोहितचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाला असल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते भरत भगत, गोरख शेप यांनी देखील या रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रोहितच्या मृत्यूप्रकरणी रोहितचा भाऊ ललित भगवान गवळी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहितचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in