खड्ड्यांमुळे बसखाली आलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

मृत पावलेल्या तरुणाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून केडीएमसी बसचालकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
 खड्ड्यांमुळे बसखाली आलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात आदळून हा तरुण शेजारून जाणाऱ्या भरधाव वेगातील केडीएमसीच्या बसखाली आला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या तरुणाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून केडीएमसी बसचालकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अंकित राजकुमार थैवा (२६) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.अंबरनाथ येथील एमआयडीसी रोडला असलेल्या आनंदनगर मधील गुड मॉर्निंग सोसायटीतील अंकित हा हेल्थ केअर फार्मा कंपनी (घणसोली, नवी मुंबई ) येथे काम करत होता.नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एमएच ०५. इडी - ८२२५ क्रमांकाच्या स्कूटरवरून कामाला निघाला होता.अंकित हा बदलापुर रोडने काटई सर्कलकडे जाणाऱ्या रोडवर खोणी म्हाडा वसाहतीसमोर आला असता रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात त्याची स्कूटर आदळली.बाजुने चाललेल्या केडीएमसीच्या एमएच ०५ आर - ११०४ क्रमांकाच्या बसखाली येऊन गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मृत तरुणाचे वडील रामकुमार थैवा थैवा थैवा (५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून केडीएमसीच्या बस चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सध्या पावसाच्या तडाख्याने साऱ्याच रस्त्यांची वाताहत झाली आहे. यात बदलापूर पाईपलाईन रोडला देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यात खड्ड्यात आदळून छोट्या-मोठ्या वाहनचालकांचे अपघात होत आहेत.कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ९० फुटी समांतर रोड वरील म्हसोबानगर ते चोळेगाव रस्ताचे १४ जून रोजी डांबरीकरण करण्यात आले होते. मागील आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in