
नवी मुंबई : अमली पदार्थाची विक्री करताना, पकडला गेलेला व गेल्या १५ दिवसांपासून तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या एका आरोपीचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश पांडुरंग उंडे (४१) असे या आरोपीचे नाव असून गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने तळोजा कारागृहात दिली.
या घटनेतील मृत आरोपी अविनाश उंडे हा कोपरखैरणे सेक्टर-१८ भागात राहत होता. गत ४ जुलै रोजी अविनाश हा कोपरखैरणे सेक्टर-१५ मधील गुलाबसन्स डेअरी जवळ ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असताना त्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याच्याजवळ असलेले ३० हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले होते. त्यानंतर ७ जुलै रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी अविनाश उंडे याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी अविनाशला ताप आल्याने त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ जुलै रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान अविनाशला फीट आल्याने त्याला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालय दाखल केले होते.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाश उंडे याची तपासणी करून त्याला पुढील उपचाराकरिता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. जे. जे. रुग्णालयात अविनाशला अंतरुग्ण म्हणून दाखल करण्यात येऊन त्याच्या उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.