ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भावतीची कळवा रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ९ दरम्यान घडली आहे. या घटनेत एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. पोटात दुखू लागल्याने ही गर्भवती महिला पालिकेच्या कळवा रुग्णालयात पहाटे ४ च्या दरम्यान आली. मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने ती महिला पुन्हा रुग्णालयात आली, मात्र रुग्णालयात पोहोचण्यात उशीर झाल्याने गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. एका बालकाला रुग्णालयाच्या बाहेरच जन्म दिल्यानंतर दुसऱ्या बालकाची प्रसूती मात्र रुग्णालयात करण्यात आली असून दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
आपल्या वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कळवा पूर्व येथील अतिकोनेश्वर परिसरात राहणाऱ्या महिलेने आपले नाव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातच नोंदवले होते. याच रुग्णालयात तिच्या नियमित तपासण्या सुरू होत्या. मंगळवारी पहाटे पोटात दुखू लागल्याने ती पहाटे ४ च्या दरम्यान कळवा रुग्णालयात आली. मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले.
प्रसूतीची वेळ अद्याप आली नसल्याचे कारण देत तिला घरी पाठवण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर काही वेळात तिच्या पुन्हा पोटात दुखू लागल्याने ओला करून या महिलेला तिच्या नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. रुग्णालयात आणेपर्यंत उशीर झाल्याने या महिलेची रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. यामध्ये गाडीतच एक मूल बाहेर आले. त्यानंतर तातडीने या महिलेला लेबर वॉर्डला नेण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या मुलाला या महिलेने रुग्णालयात जन्म दिला. मात्र दुर्दैवाने गाडीत प्रसूती झालेल्या बालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या महिलेने आपल्याच रुग्णालयात प्रसूतीसाठी नावनोंदणी केली होती. सदरची महिला ही आठ महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिची प्रसूतीची वेळ आली नव्हती. जेव्हा सकाळी ९ च्या दरम्यान ही महिला आली तेव्हा तिची रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. रुग्णालयाच्या वतीने तातडीने या महिलेला शस्त्रक्रिया विभागात नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले. यामध्ये एका बालकाचे वजन १.४ किलो असल्याने ते फार अशक्त होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या बालकाचे वजन २ किलोच्या वर असल्याने हे बालक व्यवस्थित आहे.
- डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, कळवा रुग्णालय
तीन महिन्यांत ४९ नवजात बालके दगावली
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नवजात बालकांसाठी मृत्यूचे व्दार ठरत असून गेल्या तीन महिन्यांत या रुग्णालयात ४९ नवजात बालके दगावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दगावलेली सर्व नवजात बालके ही एनआयसीयूमधील असून विशेष म्हणजे यामध्ये अडीच किलोंच्या वर वजनाच्याही काही नवजात बालकांचा देखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांचा डेथरेट हा सरासरी ७ टक्के असायला हवा तोच डेथरेट २३ टक्क्यांच्या वर असून गेल्या चार वर्षांत हा डेथरेट २० टक्क्यांच्या खाली आलेला नाही.
...तर घटना टाळता आली असती
ज्यावेळी ही महिला पहाटे पोटात दुखत असल्याने रुग्णालयात आल्यानंतर या महिलेला तेव्हाच दाखल करून का घेण्यात आले नाही? असा प्रश्न आता नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. कळवा रुग्णालय ते अतिकोनेश्वर नगर यामधील अंतर जास्त असल्याने तसेच हा भाग डोंगरपट्ट्यातील असल्याने रुग्णालयात वेळेत पोहचणे शक्य नाही. याशिवाय सकाळी ८ च्या नंतर कळवा अंतर्गत परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे रुग्णालयात वेळेत पोचवणे शक्य नसल्याने तेव्हाच या महिलेला दाखल केले असते तर हा अनर्थ टळला असता अशी भावना नातेवाईकांकडून व्यक्त केली जाते.