उल्हासनगर : अंबरनाथ पश्चिम येथील शंकर हाइट्स इमारतीत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. इमारतीच्या डकमध्ये एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळल्याने परिसरात संताप आणि शोककळा पसरली आहे. या निर्दयी कृत्याने मानवतेच्या मूलभूत तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास शंकर हाइट्स इमारतीतील काही रहिवाशांना इमारतीच्या डकमध्ये एक नवजात स्त्रीअर्भक मृतावस्थेत आढळलं. अर्भकाला पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी तातडीने स्थानिक समाजसेवक उमेश पाटील यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उमेश पाटील यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली असून दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.
प्राथमिक तपासानुसार, या नवजात अर्भकाचा जन्म रात्रीच्या सुमारास झाला असावा. बाळ अविवाहित मातेचं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाळाला खरोखर इमारतीवरून फेकून दिलं गेलं की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घटनेबाबत बोलताना समाजसेवक उमेश पाटील म्हणाले, “एका निष्पाप नवजात अर्भकावर अशी अमानवी वागणूक देणं ही मानवतेच्या तत्त्वांवर लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलिसांनी यामागचं सत्य शोधून दोषींना कठोर शिक्षेची शिक्षा करावी,” अशी त्यांनी मागणी केली. या घटनेमुळे अंबरनाथमधील नागरिक संतप्त झाले आहेत.