कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू ; पोलिसांकडून न्यायालयीन चौकशी

कल्याण पूर्व मध्ये कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक ऑपरेशन ऑल आऊट मोहीम सुरू केली होती
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू ; पोलिसांकडून न्यायालयीन चौकशी

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री कल्याण पूर्व भागातील एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दीपक भिंगारदिवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या मारहाणीत भिंगारदिवे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर फिट येऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दीपक यांच्या मृत्यूचा सखोल पंचनामा आणि शवविच्छेदन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रक्रियेचे रेकोर्डिंग करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
कल्याण पूर्व मध्ये कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक ऑपरेशन ऑल आऊट मोहीम सुरू केली होती. या मोहिमे दरम्यान प्रतिश भिंगारदिवे (२४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. मुलगा प्रशिक्षक याला पोलीस ठाण्यात अचानक नेण्यात आल्याने त्याचे वडील दीपक भिंगारदिवे (६३) पोलीस ठाण्यात दाखल होत, मुलाला पोलीस ठाण्यात का आणले म्हणून याची माहिती घेण्यासाठी आले होते. प्रतिशची पोलीस चौकशी करत असताना त्याचे वडील दीपक भिंगारदिवे यांनी त्यांच्या मोबाईलमधून पोलीस करत असलेल्या चौकशीचे रेकॉर्डिंग करत होते. दीपक यांनी मोबाईल मधून चित्रीकरण करू नये म्हणून पोलिसांनी त्यांना समजावले. त्यांना पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षामागील भागात बसविण्यात आले होते. तेथे त्यांना अचानक फिट आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही माहिती तातडीने गुन्हे शाखेला देऊन ते पथक तात्काळ पोलीस ठाण्यात आले.
या प्रकरणाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱी यांच्यामार्फत चौकशी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. ती सर्व माहिती तातडीने गुन्हे शाखा, न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशीसाठी देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांगितले. पोलीस ठाण्यातील घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण रात्रीच गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे, असे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
 
भिंगारदिवे कुटुंबियांचे आरोप
प्रतिश भिंगारदिवे हा सार्वजनिक ठिकाणी असताना त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीसांनी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मुलाला पोलिस घेऊन गेल्याची माहिती मिळताच मुलाला सोडविण्यासाठी वडील दीपक पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांना तेथे पोलिसांनी त्यांच्याशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असा आरोप भिंगारदिवे कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
दरम्यान “राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी दीपक भिंगारदिवे यांचा पोलीस चौकीत कोणताही गुन्हा नसताना झालेल्या मारहाणीमुळे चौकीत मृत्यू झाला. जे उपस्थित होते आणि ज्यांनी त्याला आणले त्या सर्वांवर एफ आय आर नोंदवण्यात यावी, हे प्रकरण दबावण्याचा प्रयत्न करू नका” अशा प्रकारचा मेसेज मुंब्रा कळव्याचे आमदार राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता.  

मयत भिंगारदिवे यांच्याबाबत स्थानिक राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांना विचारले असता भिंगारदिवे असा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता नाही आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नाही असे सांगितले. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले की, मयत भिंगारदिवे यांच्या कुटुंबातील महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी आहेत असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in