
भाईंदर : दहिसर ते भाईंदर मेट्रोचे काम पूर्ण करून लवकर मेट्रो सुरू करावी याची प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहेत. एमएमआरडीएने मीरा-भाईंदर शहरात दोन टप्प्यात मेट्रो सुरू होईल असे ऑगस्ट महिन्यात पत्रकाद्वारे जाहीर केले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव ही डिसेंबर २०२४ ला व दुसऱ्या टप्प्यात काशीगाव ते भाईंदर ही डिसेंबर २०२५ ला सुरू होईल असे सांगितले होते. परंतु डिसेंबर महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत या मार्गावरील काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशिगाव दरम्यान मेट्रो सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे.
मीरा-भाईंदर शहरातील प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामध्ये वेळ व पैसे देखील जास्त खर्च होतात. येथील प्रवास जलद व सुखद व्हावा यासाठी दहिसर ते भाईंदर पश्चिम असे मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात आले. राज्य शासनाने दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ चे काम सुरू करण्यास ९ सप्टेंबर २०१९ रोजी मान्यता दिली. हा प्रकल्प पुढील ६ वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले होते. या प्रकल्पाला सहा वर्षे पूर्ण झाली, परंतु अद्यापपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
दहिसर ते भाईंदर मेट्रोचे काम लवकर पूर्ण करून त्याची सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
पुढच्या वर्षी होणार पूर्ण
दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प यंदा पूर्ण होणे अपेक्षित असला तरी मेट्रोच्या कामाची स्थिती पाहता तो या वर्षी पूर्ण होणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोच्या प्रतिक्षेत असलेल्या मीरा-भाईंदरमधील प्रवाशांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने ही मेट्रो लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.