शहरात डिलक्स शौचालय, आदिवासी पाड्यात वानवा; वर्तकनगर प्रभाग समितीवर ठाकरे गटाचा मोर्चा

या सर्व आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची समस्या असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेली शौचालये नादुरुस्त असून, किमान शौचालयासारखी प्राथमिक सुविधा तरी द्या, अशी मागणी आदिवासी महिलांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे
शहरात डिलक्स शौचालय, आदिवासी पाड्यात वानवा; वर्तकनगर प्रभाग समितीवर ठाकरे गटाचा मोर्चा

ठाणे : ठाणे शहरात एकीकडे डिलक्स शौचालयांची सुविधा देणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाचे येऊरमधील आदिवासी पाड्यांवर अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे. आधीच या सर्व आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची समस्या असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेली शौचालये नादुरुस्त असून, किमान शौचालयासारखी प्राथमिक सुविधा तरी द्या, अशी मागणी आदिवासी महिलांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने वर्तकनगर प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला असून, एका आठवड्यात शौचालयांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी दिला आहे.

ठाणे शहराला लागून असलेल्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या येऊरमध्ये शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. या भागात असलेल्या ७ पैकी ५ शौचालय नादुरुस्त अवस्थेत आहे. एकीकडे स्वच्छतेच्या कामावर कोटीं रुपये खर्च सुरू असताना मात्र येऊर परिसरातील शौचालय जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या संदर्भात महापालिकेकडे वारंवार विचारला केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसून वर्तक नगर मधील प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवी ची उत्तरे दिली जात आहेत. शिवसेनेचे उपशहर प्रमूख भास्कर बैरी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वर्तक नगर प्रभाग समितीवर स्थानिक महिलांना सोबत घेऊन आज सकाळी धडक देण्यात आली. यावेळी बिथरलेल्या प्रशासनाने उद्याच या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येऊ आणि तत्काळ चला याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

logo
marathi.freepressjournal.in