मास्टिकसाठी सरकारी यंत्रणांची धावपळ; जलद गतीने खड्डे बुजवण्यासाठी मागणी वाढली

खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागत आहे.
मास्टिकसाठी सरकारी यंत्रणांची धावपळ; जलद गतीने खड्डे बुजवण्यासाठी मागणी वाढली
Canva
Published on

ठाणे : खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागत आहे. विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आपल्या परिक्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी इतर प्राधिकारणांकडूनही मास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असल्याने मास्टिक मिळवण्यासाठी सध्या सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असे असले तरी दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र घोडबंदर, घोडबंदरवरील उड्डाणपूल, मुंबई-नाशिक हायवे, आशा एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे यांच्या अखत्यारित येत असलेल्या खड्ड्यांमुळे या यंत्रणांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तो भाग वेगळा. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कॅडबरी, नितीन, वाघबीळ आदी उड्डाणपुलांसह, मुंबई ­नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

मास्टिक पुरवठादारांची संख्या कमी

खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स, पेव्हर ब्लॉकपेक्षाही मास्टिक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडी, एमएसआरडीसी असेल या सर्वच प्राधिकणांनी मास्टिकचा वापर करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वर खाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मास्टिक उपलब्ध होणे कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. घोडबंदर मार्गावरच मास्टिकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या फार कमी असल्याने मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांची चांगलीच धावपळ होत आहे.

काय आहे मास्टिक तंत्रज्ञान?

डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले तेथे चांगला परिणाम दिसून आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in