एसी लोकल कर्जतपर्यंत नेण्याची प्रवाशांची मागणी

या लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या लोकल बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहेत
एसी लोकल कर्जतपर्यंत नेण्याची प्रवाशांची मागणी

कर्जत : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता एसी लोकल सुरू केल्या आहेत. परंतु एसी लोकल बदलापूरपर्यंतच धावत आहे, त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्या कर्जतपर्यंत वाढवाव्यात अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.

प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू केल्या आहेत. या लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या लोकल बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहेत. त्यामुळे बदलापूरच्या पुढे प्रवास करणाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर एसी आणि सामान्य लोकलच्या गर्दीमध्ये देखील बरीच तफावत असल्यामुळे प्रवशांना एसी लोकलचा प्रवास सुखदायक वाटतो. यामुळे एसी लोकलच्या फेऱ्या कर्जतपर्यंत कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगिलाल ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्र पाठवून विचारणा केली असता कर्जतसाठी एसी गाड्या सुरू करता येतील. सध्या ज्या लोकल कर्जतपर्यंत धावत आहेत,त्यातील काही लोकल एसी म्हणून सुरू करण्यात येतील. मात्र जादा एसी लोकल गाड्या सुरू करण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मात्र रेल्वे प्रशासना या धोरणावर नाराजी व्यक्त करत हा निर्णय चुकीचे असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. दोन लोकलमध्ये खूप वेळाचे अंतर आहे. त्या मधल्या वेळेत प्रवाशांच्या मागणीनुसार एसी लोकल सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल व रेल्वे प्रशासनाचे आर्थिक उत्पन्नही वाढेल.

कर्जतसाठी एसी लोकल सुरू केल्यास स्वागतच आहे. या लोकल सुरू करताना सध्या सुरू असलेल्या कोणत्याही लोकलचे रूपांतर एसी लोकलमध्ये नसावे. त्यासाठी जास्त अंतराच्या वेळेत या नवीन एसी लोकल सुरू कराव्यात. -पंकज मांगिलाल ओसवाल,

सामाजिक कार्यकर्ता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in