कर्मचाऱ्याची आत्महत्या नसून खून; ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
कर्मचाऱ्याची आत्महत्या नसून खून; ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव याने सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. ग्रामपंचायतीने गेले ९ महिने त्याचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे. तसेच मनसेच्या भूमिकेला आजाद समाज पार्टी, व शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान गणेश जाधव याने आत्महत्या केली नसून, नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित केला जात नाही. गेले अनेक वर्षांची ही समस्या असून, कर्मचारी देखील ग्रामपंचायतीकडे दाद मागून थकले आहेत. दरवेळी पगार शिल्लक राहून कधी एक कधी दोन अशी पगार होत असल्याने आता पर्यंत किमान ९ पगार थकली आहेत. बँकेचे कर्ज, बचतगट, पतपेढी यांचे कर्ज, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च आदी खर्च भागवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. अशात याच आर्थिक संकटाना तोंड देताना घरातील आर्थिक वादावरून गणेश जाधवने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.

यावरून आता मनसेने नेरळ ग्रामपंचायत विरोधात दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आजाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने नेरळ पोलीस ठाण्यात धडक देत नेरळ ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in