अडीच दशकांपासून प्रलंबित असलेल्या पोशीर धरणाच्या उभारणीला गती देण्याची मागणी

पोशीर धरण उल्हासनदीची उपनदी असलेल्या पोशीर नदीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुरुंग गावाजवळ प्रस्तावित आहे
अडीच दशकांपासून प्रलंबित असलेल्या पोशीर धरणाच्या उभारणीला गती देण्याची मागणी

गेल्या दोन-तीन दशकात बदलापुरचा झपाट्याने विकास झाला असला तरी वारंवार काही समस्या मात्र आजही कायम आहेत. त्यापैकी एक आहे पाणी समस्या. पोशीर धरणाची उभारणी हा या समस्येवर मात करण्यासाठी चांगला उपाय ठरू शकेल असे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांचे मत आहे. गेल्या अडीच दशकांपासून प्रलंबित असलेल्या पोशीर धरणाच्या उभारणीला राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सहा प्रमुख शहरे आणि ९८ खेड्यांना पाणीपुरवठा करता येईल असे पोशीर धरण उल्हासनदीची उपनदी असलेल्या पोशीर नदीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुरुंग गावाजवळ प्रस्तावित आहे. त्यानुसार पोशीर धरणासाठी २१९२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या धरणामुळे ग्रामीण भागातील तसेच खेड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो.

पोशीर धरणात ३५५ दशलक्ष घनमीटर पाणी साठा असणार आहे. हे पाणी ७२५ दशलक्ष लिटर प्रमाणे परिसरातील शहरांना २८५ दिवस पुरविण्याचे नियोजन आहे. पोशीर धरणासाठी लागणाऱ्या प्रस्तावित २१९२ हेक्टर जमिनिपैकी ९७१ हेक्टर जमीन वनविभागाची तर १२२१ हेक्टर जमीन खाजगी असणार आहे. कर्जत तालुक्यातील बोरगाव, चाई, चेवणे, उंबरखांड, भोपाली, पेंडरिवबोंडशेत, अशा आठ गावातील ही खाजगी जमीन आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सादर करण्यात आलेल्या या धरणाच्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे. त्यांनी या प्रकल्पास वितोध दर्शविला होता. त्यामुळे विस्थापतांचा प्रश्न व वन जमिनीचा तिढा यात हे धरण अडकले आहे. मात्र आता पाण्याचा वापर करणाऱ्या पालिकांनी प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध जागेप्रमाणे नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे भूसंपादन कायदा २०१३ नुसार शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळू शकतो. तसेच या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या दूर होतानाच बदलापुरात उल्हासनदीला येणाऱ्या पुराचा धोका कमी होईल व शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल, असे राम पातकर यांनी सांगितले.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना जिल्ह्यातील समस्यांची जाण असून ते मार्गी लावण्याची तळमळही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून पोशीर धरणाचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, अशी अपेक्षाही पातकर यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in