आशा स्वयंसेविकांची ठाण्यात निदर्शने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आशा वर्करतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात मोठ्या प्रमाणावर जमून आंदोलन करण्यात आले होते
आशा स्वयंसेविकांची ठाण्यात निदर्शने

ठाणे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी शहापूर ते ठाणे दरम्यान काढलेली पदयात्रा शुक्रवारी ठाण्यात धडकली. गुरुवारी शहापुरातून निघालेल्या या पदयात्रेत आशा स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आशा स्वयंसेविकांनी पोहोचून तीव्र निदर्शने केली. यावेळी भिवंडी, मुरबाड, शहापूर तालुक्यातील आशा स्वयंसेविका महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचल्या होत्या. आशा स्वयंसेविकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडला. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, आशा स्वयंसेविकांच्या या पदयात्रेला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने पाठिंबा दिला असून परवा शहापुरातून निघालेल्या आशा स्वयंसेविकांना उष्माघाताचा त्रास होऊन भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळीही जिजाऊच्या कार्यककर्त्यांनी घटनास्थळी आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात देत त्याच्या औषधोपचारापासून इतर सुविधा पुरविण्यास जिजाऊने पुढाकार घेत आशा स्वयंसेविकांना न्याय मिळेपर्यंत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था त्यांच्या सोबत राहिल,असा विश्वास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ यांच्यावतीने या पदयात्रा मोर्चाचे आयोजन केले असून आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत निदर्शने करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

आश्वासनांची अंमलबजावणी करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आशा वर्करतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात मोठ्या प्रमाणावर जमून आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांना ‘शुभेच्छा घ्या, जीआर द्या’ हे आशा कर्मचाऱ्यांचे साकडे कॉ. राजू देसले, कॉ. नयन गायकवाड, कॉ. संजय नागरे, कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना आशा गट प्रवर्तकांनी केले आहे. या जीआरमध्ये गट प्रवर्तकांना १०,०००, आशा वर्कर्सना ७,०००, दिवाळी बोनस २००० चा लाभ हा सरसकट सर्व आशा वर्कर्सना देण्यात येतील, आरोग्याचे १५०० हे गट प्रवर्तकांना देण्यात येईल, अशी आश्वासने शासनाकडून देण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत न झाल्याने आशा वर्कर्स संघटनांनी आक्रमक पाऊल उचलले आहे.

logo
marathi.freepressjournal.in