सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याचा अलिबाग-श्रीवर्धनच्या धर्तीवर विकास!

वसई तालुका हा निसर्गसंपन्न आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्टीला जवळपास २८ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याचा अलिबाग-श्रीवर्धनच्या धर्तीवर विकास!

वसई : वसईतील सुरुची बागेचा विकास अलिबाग-श्रीवर्धनच्या धर्तीवर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटन विभागाच्या सचिवांना दिले आहेत. वसई शहरातील सुरुची बाग हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. या किनाऱ्याच्या एका बाजूला ऐतिहासिक वसई किल्ला तर दुसऱ्या बाजूला खाडी व समोर उत्तन (भाईंदर) धारावी देवी डोंगरी असे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक तसेच मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा किनारा ‘पर्यटन क्षेत्र’ म्हणून विकसित पावेल. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या सुरुची बाग किनाऱ्याचा अलिबाग व श्रीवर्धनच्या धर्तीवर विकास करण्यात यावा, अशी संकल्पना भाजपचे वसई विधानसभा संघटक प्रमुख मनोज पाटील यांनी मांडली होती. या संदर्भात त्यांनी पर्यटन व ग्रामविकास-पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या संकल्पनेला पर्यटन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वसई तालुका हा निसर्गसंपन्न आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्टीला जवळपास २८ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पश्चिमेस मोठ्या प्रमाणात हरित पट्टा, ऐतिहासिक वसईचा किल्ला, जंजिरा-अर्नाळा किल्ला आहे. त्यामुळे हा भाग पर्यटनदृष्ट्या मोठ्या वेगाने विकसित होत आहे. वसई-विरारचा शहरी भाग तसेच मुंबई आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. आठवड्याच्या शेवटी व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या आणखी मोठी असते. त्या तुलनेत पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत; शिवाय समुद्रकिनारी मनोरंजनाची सुविधा नाही. त्यामुळे वसईतील सुरुची बागेचा अलिबाग-श्रीवर्धनच्या धर्तीवर विकास करण्यात यावा, अशी संकल्पना मनोज पाटील यांनी मांडली आहे.

या संकल्पनेनुसार, समुद्रकिनारी फिरण्यासाठी १.१ की. मी. १५ फूट रुंद पायवाट, निरीक्षण कट्टा, लहान मुलांसाठी मनोरंजन उद्यान, महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी प्रसाधानगृह, खुली व्यायामशाळा व योगा पार्क या ठिकाणी असावे. यासोबतच संरक्षण भिंत, स्वागत कमान, सौंदर्यीकरण, पाइप कल्वर्ट आणि उतार रस्ता अशी अंदाजित साडेचार कोटी रुपयांची कामे या ‘पर्यटन विकास आराखड्यात’ मनोज पाटील यांनी सूचविली आहेत.

वसई-विरार शहरांसाठी ‘पर्यटन विकास आराखडा’

वसई-विरार शहरांचा पर्यटन विकास व्हावा. आदरातिथ्य क्षेत्राचा विकास व्हावा व त्यातून स्थानिक समुदायांकरिता रोजगाराची संधी निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत महापालिकेने वसई-विरार शहरांसाठी ‘पर्यटन विकास आराखडा` तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नगररचना विभागाला सल्लागार नियुक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वसईतील सुरुची बागेचा प्राधान्याने या विकास आराखड्यात समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी देखील मनोज पाटील यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in