कळव्यातील खारभूमी मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये जुंपली

कळव्यातील खारभूमी मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये जुंपली

ठाणे : कळव्यातील खारभूमी मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शासनाच्या या मैदानाचा आव्हाडांकडून व्यावसायिक वापर होत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला आहे.

“आव्हाडांना जनतेविषयी एवढेच प्रेम असेल, तर हे मैदान सर्वांसाठीच मोफत खुले करावे, असे आव्हान मुल्ला आणि परांजपे यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे. दुसरीकडे जे कार्यकर्त्यांचे होऊ शकले नाहीत ते पक्षाचे काय होणार?”असा प्रतिटोलाही आव्हाड यांना या दोन्ही नेत्यांनी लागावला आहे.

कळव्यातील खारभूमी येथील मैदान जिल्हाधिकाऱ्यांकडून बंद करण्यात आल्याने यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे मैदान अजित पवार यांच्याच आदेशाने बंद करण्यात आले, असल्याचा आरोप केला होता. याशिवाय या राजकारणात मुलांचे नुकसान होत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतित्युर दिले आहे. औरंगजेबला जसे संताजी, धनाजी दिसायचे, तसेच आव्हाडांना स्वप्नात अजित पवार दिसत असल्याचे परांजपे ,म्हणाले. हे ग्राउंड शासनाच्या मालकीचे असून, आव्हाडांनी मात्र आपली जहागीर असल्यासारखे या मैदानाचा वापर केला आहे. मैदानाचे रीतसर भाडे भरूनही आव्हाडांच्या गुंडांकडून मला अडवण्यात आले होते, असे परांजपे यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेला कार्यक्रम करू देत नव्हते. या मैदानाला टाळे ठोकण्याची कारवाई ज्या पैठणकर अधिकाऱ्याने केली आहे, त्यांना देखील पालिकेचे अधिकारी महेश आहेर आणि कारमुसे सारखी मारहाण होऊ नये यासाठी त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणीही परांजपे यांनी केली.

शासकीय जमिनी यांचा मालकीच्या आहेत का?

माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी देखील आव्हाडांवर टीका केली असून, लहान मुलांचा वापर करून राजकारण करणे योग्य नसल्याचे मुल्ला म्हणाले. खेळाचं राजकारण नको, मुलांचा वापर करायचा हे दुर्दैवी आहे, क्रिकेटवसाठी माझं काय योगदान आहे ते सर्वांना माहीत आहे; मात्र या ठिकाणी पैसे घेऊन सरकारी जागेत प्रशिक्षण होतं असा आरोप मुल्ला यांनी यावेळी केला. दादांना मुख्यमंत्री असल्याचे मटेरियल सांगायचं आणि त्यांची मिमिक्री करायची, आणि निधी मागायचं हा अभिनय आव्हाडांना चांगला जमतो. सरकारी जागेवर टर्फ बांधण्यात आला आहे, शासकीय जमिनी यांचा मालकीच्या आहेत का? असा प्रश्न देखील मुल्ला यांनी उपस्थित केला. स्टेशनला असलेलं बेकायदेशीर पार्किंग, या पार्किंगचे पैसे कोण घेतो आणि हप्ते घेतो, त्यावर कारवाईची मागणी केली असून, हे पार्किंग मोफत देण्याची मागणी आपण केली असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. तसेच ७२ एकरवर चाळी बांधणारे कोण आहेत, हे देखील लवकरच समोर आणणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

आव्हाड यांचे कार्यालय अनधिकृत

सह्याद्री येथील जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय देखील अनधिकृत असून, ही जागा सामाजिक भावना यासाठी असल्याचे परांजपे यांनी सांगितले. या ठिकाणी ठाणे महापालिकेचे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ७५ लाख रुपये खर्च करून लायब्ररी बांधण्यात आली असल्याचा आरोपही परांजपे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in