ठाणे पालिके कडुन बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींवर पोलीस प्रशासनाची नाराजगी

ठाणे पालिके कडुन बसवण्यात आलेल्या  सीसीटीव्हींवर पोलीस प्रशासनाची नाराजगी

ठाणे शहरात पालिकेच्या खर्चातून जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यांचा दर्जा योग्य नसल्याचा आक्षेप पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे जिल्हा समितीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र त्याला वर्ष होत आले तरी सीसीटीव्ही बसवण्यासाठी चालढकल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रभाग सुधारणा निधीतून १२०८, वायफाय योजनेतून इतर असे एकूण १४९८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान सीसीटीव्हींची देखभाल व दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मार्च २०२१ रोजी या ठेक्याची मुदत संपली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने नवे टेंडर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे या कॅमेऱ्यांची जवळपास तीन महिने देखभाल दुरुस्ती झाली नव्हती आणि महत्त्वाच्या ठिकाणावरील ३० ते ३५ टक्के सीसीटीव्ही बंद झाले असल्याचे खळबळजनक वास्तव काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत आरडाओरड होताच तत्काळ निविदा काढण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती आणि देखभाल निगराणीसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पोलिसांच्या मदतीसाठी पालिकेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पाेलिसांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ठाणे पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त यांनी या संदर्भात ठाणे महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्प योजनेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून याबद्दलचा अहवाल सादर केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेवरच आक्षेप घेण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in