प्रताप सरनाईक यांच्याकडून ५१ हजार किलो साखर वाटप

फटाके फोडून, ढोलताशे वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले
प्रताप सरनाईक यांच्याकडून ५१ हजार किलो साखर वाटप

भाईंदर : प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक हे श्रीराम भक्तांना ५१ हजार किलो साखर प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत. मतदारसंघात महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी प्रत्येक भक्ताला १ किलो साखर प्रसाद म्हणून देऊन आनंद जल्लोष केला जाणार आहे. फटाके फोडून, ढोलताशे वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

“२२ जानेवारीची घटना ऐतिहासिक आहे आणि भाविकांना त्या क्षणाचे साक्षीदार व्हावे, यासाठी माझ्या मतदारसंघात २ ठिकाणी भव्य महा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महाआरती करण्यासाठी उत्तर प्रदेश जबलपूर येथून खास ११ पुरोहित बोलावण्यात आले आहेत. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर जशी महाआरती केली जाते, तेच आरती करणारे ब्राम्हण आणि तसेच मोठे दिवे आरतीसाठी मीरा-भाईंदरच्या महाआरतीच्या ठिकाणी आणण्यात येणार आहेत,” असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

येथे होणार महाआरती

मीरा-भाईंदर शहरात २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जरीमरी तलाव, काशिमीरा येथे महाआरती होणार आहे.

सायंकाळी ७ वाजता नवघर तलाव, एस.एन. कॉलेजसमोर, भाईंदर (पूर्व) येथे महाआरती होणार आहे.

त्याचबरोबर श्रीराम नामसंकीर्तन, श्रीराम राज्य रथ यात्रा, शोभा यात्रा असे विविध कार्यक्रमही शिवसेनेकडून आयोजित करण्यात आले आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in