राज्यस्तरीय सुधारित निर्धूर चुलीचे लाभार्थ्यांना वितरण; रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

महाप्रीततर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेले असून ते समाजोपयोगी आहेत
राज्यस्तरीय सुधारित निर्धूर चुलीचे लाभार्थ्यांना वितरण; रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमवगळून), अन्न व नागरी पुरवठा, ग्राहकसंरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महाप्रीतच्या वतीने महादिवा उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय सुधारित निर्धूर चुलीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित (महाप्रीत) या निमशासकीय कंपनीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा महाप्रीतचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे, महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम आदी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, महाप्रीततर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेले असून ते समाजोपयोगी आहेत. सुधारित निर्धूर चुलींच्या वितरणामुळे पर्यावरणाचा जो आज विविध घटकांमुळे ऱ्हास सुरु आहे, तो टाळण्यास मदत होणार आहे. इंधन बचत होणार असून महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यास सहाय्य होणार आहे. यावेळी बिपीन श्रीमाळी यांनी या सुधारित निर्धूर चुली वितरणाचा उद्देश स्पष्ट केला. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सोमवारी ठाणे येथून करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यात ४ लाख निर्धुर चुलींचे वितरण मागासवर्गीय लाभार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना सुधारीत निर्धूर चुलींचे वितरण मंत्री चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निर्धूर चूल वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपवर मागासवर्ग समाजातील लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाप्रीतचे विजयकुमार काळम-पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in