उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून, एक मोठा वाद समोर आला आहे. उल्हासनगरमधील गोलमैदान येथे झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात, क्रिश बजाज यांच्या तक्रारीवरून अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष भरत गंगोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर एक आठवडा उलटून गेल्यानंतर पुरब गंगोत्री यांच्या तक्रारीवरून कलानी समर्थक समजले जाणारे क्रिश बजाज आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर घटना ७ सप्टेंबरच्या रात्री घडली होती, जेव्हा क्रिश बजाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरत गंगोत्री आणि इतरांसोबत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. हा वाद विश्वराज मित्र गणपती मंडळाच्या समोर घडला होता, ज्यामुळे या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडवली. या घटनेनंतर पोलिसांनी क्रिश बजाजच्या तक्रारीवरून भरत गंगोत्री व त्याचा मुलगा पुरब गंगोत्री यांच्यासह इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मात्र हा गुन्हा दाखल झाल्यावर भरत गंगोत्री यांनी क्रिश बजाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आणि त्वरित कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ७ दिवसांनी पुरब गंगोत्री यांच्या तक्रारीनंतर क्रिश बजाज, आयुष साहित्य, ललित लासी, कुणाल वसिष्ठा, देवेश कुकरेजा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गंगोत्री यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, ७ सप्टेंबरच्या रात्री विश्वराज मित्र गणपती मंडळाच्या समोर झालेल्या या घटनेत क्रिश बजाज आणि त्यांच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये आयुष साहित्य, ललित लासी, कुणाल वसिष्ठा आणि देवेश कुकरेजा यांचा समावेश आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील राजकीय घडामोडींमध्ये हा वाद अधिक तापलेला दिसत आहे.
गंगोत्री आणि कलानी घराण्यातील राजकीय संघर्ष उल्हासनगरमधील एक चर्चेचा विषय आहे. गंगोत्री यांनी निवडणुकीत उभे राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर या घटनेने राजकीय रंग घेतला आहे, आणि त्यामुळे शहरातील वातावरण अजूनच तणावपूर्ण झाले आहे.
शहरातील राजकीय नेत्यांमध्ये तणाव
भरत गंगोत्री हे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. या प्रकरणामुळे उल्हासनगर शहरात राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. विशेषतः गंगोत्री आणि कलानी घराण्यांमध्ये जुनी राजकीय दुश्मनी असल्यामुळे हा वाद अधिक चर्चेत आला आहे. शहरातील राजकीय नेत्यांमध्ये तणाव वाढत असल्याचे स्पष्ट संकेत या घटनेने दिले आहेत.