
जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्यसरकारने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्ह्यासाठी प्रथमच पर्यटन विकास अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. याच संदर्भाने जिह्यातील पर्यटनात वाढ होण्यासाठी काही ठोस प्रयत्न करण्याची चाचपणी सुरु करण्यात आली होती आणि पर्यटन स्थळांचा समूह विकास आराखडा तयार करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवण्यात आला होता; मात्र गेल्या दोन वर्षापासून यासाठी आवश्यक एजन्सीच मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती दैनिक नवशक्तिला मिळाली आहे.
ठाणे जिल्हयाला मुळातच नैसर्गिक परिस स्पर्श लाभला असल्याने निसर्गतःच काही पर्यटन केंद्र विकसित झाली आहेत आणि हीच पर्यटनस्थळ मोठ्या प्रमाणात विकसित व्हावी, यासाठी जिल्ह्यात पर्यटन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जी पर्यटन स्थळ सध्या उपलब्ध आहेत त्यांचा विकास करणे तसेच नव्याने काही पर्यटनस्थळ विकसित होऊ शकतात का याचा अभ्यास करण्याचे नियोजन आहे. पर्यटनस्थळांनसाठी राज्यसरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन केंद्र विकसित होऊ शकतात, जगाच्या पाठीवर काही देश फक्त पर्यटनाच्या माध्यमातून विकसित झाले असल्याने याच धर्तीवर जिह्यातील पर्यटनस्थळांचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रयत्नही सुरु करण्यात आले होते.
पर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्यसरकार एजन्सीची नियुक्ती करणार होते; मात्र अद्याप तशी नियुक्ती झाली नसल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आली. पर्यटन केंद्रांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून त्याच माध्यमातून शासनाचा महसूलही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या कामात विशेष लक्ष देण्याची आवशक्यता आहे.