
ठाणे : अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करायला गेलेल्या दिव्याचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर एका गाळेधारकाने अचानकपणे हल्ला करत जबर मारहाण केली आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही हा हल्ला करण्यात आला आहे. कल्याणफाटा या ठिकाणी ही कारवाई सुरू होती. या हल्ल्यात घुगे जखमी झाले असून त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांविरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण फाटा या ठिकाणी चार ते पाच अनधिकृत गळयांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारच्या सुमारास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे आपल्या टीमसोबत कल्याण फाटा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहचले. यावेळी एका गाळेधारकाची आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पालिकेचे अधिकारी या गाळेधारकाची समजूत काढण्याचा प्रयन्त करत होते. मात्र कारवाईला विरोध करत या गाळेधारकाची बाचाबाची सुरूच होती. अखेर सहाय्यक आयुक्त घुगे हे कारवाईसाठी पुढे आल्यानंतर यातील एका व्यक्तीने त्यांच्या पाठीमागून जोरदार फटका मारला. तर दुसऱ्याने त्यांना धमकावत दूरपर्यंत खेचत नेले. यामध्ये त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झाले आहे.
दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांविरोधात सरकारी कामांत अडथळा आणणे तसेच अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून व महापालिकडून कठोर कारवाई झाली पाहिजे व दिवा प्रभाग समिती अंतर्गत चालू असणाऱ्या अनधिकृत बांधकाम व फेरीवाले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उबाठा पक्षाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.