दिव्यातील ११ इमारतींवर पडणार हातोडा; ३७२ कुटुंबे होणार बेघर, दोन दिवसांत २ इमारतींवर पालिकेची कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिवा शीळ परिसरातील ११ अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिका हातोडा चालवणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे ११ इमारतीतील ३७२ कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिवा शीळ परिसरातील ११ अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिका हातोडा चालवणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे ११ इमारतीतील ३७२ कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. याआधीही दिवा शीळ खान कम्पाऊंड भागात उभारण्यात आलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यानंतर आता शिळ भागातील आणखी ११ इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

त्यातील दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून एका इमारतीत तर एक खासगी शाळा आणि मस्जिद देखील आढळून आले आहे. या इमारतींमध्ये ३७२ कुटुंबे वास्तव्यास असल्याची माहिती पुढे आली आहे.

दिवा शिळ भागात खान कम्पाऊंड येथे ग्रीन झोनमध्ये उभारण्यात आलेल्या २१ इमारतींवर महापालिकेने महिनाभर कारवाई करीत येथील इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. त्यानंतर याठिकाणी वृक्ष लागवड देखील सुरू केली आहे. ही कारवाई संपत नाही तोच उच्च न्यायालयाने शिळ भागातील दोन भागात उभारण्यात आलेल्या ११ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शनिवारपासून ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा मोर्चा पुन्हा एकदा या भागाकडे वळाला आहे. त्यानुसार दोन दिवसात येथील दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आणखी एक इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतींचे बांधकाम हे २०१८-१९ मध्ये झालेले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

येथील एका जागेत १० इमारतींचे बांधकाम उभारण्यात आले आहे. याठिकाणच्या इमारती या ६ ते ८ मजल्यांच्या असून येथील सर्व इमारती व्याप्त असल्याचेही दिसून आले आहे. एका एका इमारतीत २० ते ४७ रुम असून ७० च्या आसपास गाळे आहेत. एका इमारतीत मस्जिद, एका इमारतीत क्लास आणि शाळादेखील सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही शाळा आता रिकामी करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केला आहे.

याठिकाणी दोघा विकासकांमध्ये अधिकच्या लाभावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हे प्रकरण थेट न्यायालयात गेले होते. परंतु या इमारती अनाधिकृत असल्याने न्यायालयाने थेट कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती महापालिकेने दिली. येथील १० पैकी २ इमारतींवर महापालिकेने हातोडा टाकला असून उर्वरित रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

इमारतीत खासगी शाळेचा समावेश

तळ अधिक ८ मजल्यापर्यंत असलेल्या या इमारतींमध्ये ३२९ कुटुंबांचे वास्तव्य दिसून आले आहे, तर दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तळ अधिक सात मजल्यांच्या इमारतीत ४३ रूम ६ गाळे व एका ठिकाणी पहिली ते १० पर्यंतची खासगी शाळा सुरू असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

logo
marathi.freepressjournal.in