
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
नमुंमपामध्ये ३४,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचा दिवाळी सण आनंदात साजरा व्हावा, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यंदा ३४,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात ही रक्कम वितरित केली जाणार आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रत्येकी ३४,५०० इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे तर करार/ तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २८,५०० इतकी रक्कम मिळणार आहे.
याशिवाय, सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीप्रमाणे २८,५०० अनुदान देण्यात येईल. तसेच आरोग्य विभागातील आशा वर्कर, तसेच कोविड आणि नॉन-कोविड कालावधीत कार्यरत अधिकारी-कर्मचारी, घड्याळी तासिका शिक्षक, आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही १८,५०० इतकी रक्कम मिळणार आहे.
एकूण ४,९६१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार असून, दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यांत ही रक्कम जमा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत १,५०० ने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका कर्मचारीवर्गात समाधानाचे वातावरण असून, त्यांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या कर्मचारीहिताच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ठाण्यात ९२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
ठाणे : यावर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४,५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या ९२२१ कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाणार असून, सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.
गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २४,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी त्यात वाढ करून २०२५ साठी २४,५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, तसेच वर्षभर शहरातील सर्व यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेचे ६०५९ कर्मचारी, शिक्षण विभागाचे ७७४ कर्मचारी, परिवहन विभागातील १४०० कायम कर्मचारी, तसेच थेट कंत्राटी व इतर ९८८ कर्मचारी अशा एकूण ९२२१ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचे अतिरिक्त दायित्व येणार असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाबद्दल आनंदाचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट जाहीर केली आहे. महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात यासाठी रु. १२०० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रु. २०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कायम, प्रतिनियुक्तीवरील (आयुक्त वगळता), रोजंदारी/ठोक पगारावरील, हंगामी, अस्थायी कर्मचारी, मनपा परिवहन उपक्रम, मनपा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका/सेविका/दाई, सर्व शिक्षा अभियान, आरोग्य कार्यक्रम (एनयूएचएम, राष्ट्रीय क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स नियंत्रण), कोविड-१९ पदभरती, आपत्ती व्यवस्थापन, २७ गावातील कर्मचारी, कंत्राटी वाहनचालक यांचा समावेश आहे.
याचप्रमाणे, आशा सेविका व आशा गट प्रवर्तक यांना प्रत्येकी रु. ५,०००/- इतकी दिवाळी भेट देण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानासाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी १८० दिवस किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. या कालावधीच्या प्रमाणानुसार अनुदान/दिवाळी भेट दिली जाईल.
सन २०२४-२५ मध्ये नियत वयाने, स्वेच्छा सेवानिवृत्त किंवा निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांनाही अनुदान देय राहील. मात्र संपूर्ण वर्ष निलंबित असलेले किंवा अपात्र कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. सर्व खाते प्रमुख व विभाग प्रमुखांना अटी व शर्तीनुसार देयके प्रमाणित करून लेखा विभागाकडे सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. अनुदानाची रक्कम सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ‘सानुग्रह अनुदान’ तरतूदीतून भागविली जाईल. या उपक्रमाचा कर्मचारीवृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी
भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील वर्ग १ ते ४ मधील १,४८० अधिकारी आणि कर्मचारी तसेच १४९ शिक्षक यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २५,९५३ रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. याशिवाय, मानधनावर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ४,०७८ ते १९,९८४ रुपये दरम्यान दिवाळी बोनस मंजूर केला गेला आहे.
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासकीय बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानावर ४ कोटी ८० लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कायम वेतन आणि मानधनावरील मिळून एकूण २,२०८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी आनंदात जाणार आहे. सध्या, करदात्यांच्या निधीतून ४ कोटी ८० लाख ९९ हजार रुपये खर्च होणार आहेत. जागरूक नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार, गळेलठ्ठ पगार व दिवाळी बोनस मिळाल्यानंतर अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे पालिका आणि शहराच्या हितासाठी काम करतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
सानुग्रह अनुदानाचे तपशील :
कर्मचारी प्रकार संख्या सानुग्रह अनुदान
कायम वेतन अधिकारी व कर्मचारी १,४८० ₹२५,९५३
शिक्षक-कर्मचारी (शिक्षण विभाग) १४९ ₹२५,९५३
ठोक मानधनावर आशा लिंक वर्कर २२० ₹४,०७८
संगणक चालक व सर्व शिक्षा कर्मचारी - ₹१९,९८४
वैद्यकीय विभागातील १३६ ₹१४,९२३
वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचारी ३५ ₹१६,४१५
ठोक मानधनावर शिक्षक ३८ ₹१२,६००