
मुरबाड : दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा विविध तोरणांनी, रांगोळ्यांनी सजल्या आहेत तर पणत्या, लाइटिंगने उजळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पणत्यांनी दुकाने सजली असली तरी त्यांच्या किमतीमध्ये यंदा भरमसाठ वाढ झाली आहे. मातीचा तुटवडा भासत असल्याने मातीच्या वस्तू, मडकी, पणत्या, तसेच मुलांच्या मावळे किल्ल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महागाई असली तरी ‘दीपावलीची पणती पेटलीच पाहिजे’ असा भाव ठेवून प्रत्येक घरातून खरेदीला सुरुवात झाली आहे.
तीस वर्षांपूर्वी मातीच्या पणत्यांना दीपावलीत अनन्यसाधारण महत्त्व होते. आज मात्र त्या जागी चायनीज लाइटिंग, प्लास्टिक आणि चिनीमातीच्या पणत्या आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक मातीच्या कारागिरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. तरीदेखील ग्रामीण भागात मातीच्या पणत्यांना अजूनही ओळख कायम आहे. गावागावात बनवले जाणारे मातीचे आकाशकंदील, आकर्षक कलाकृतींचे दिवे आणि पारंपारिक सजावटीच्या वस्तू यांचा उत्साह कायम आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी ‘वर्षातून एकदा येणारी दीपावली आनंदाने साजरीच केली पाहिजे’ या भावनेने लोक बाजारात गर्दी करत आहेत. फटाक्यांची दुकाने देखील थाटली गेली आहेत. सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी खरेदीचा उत्साह काही कमी झालेला नाही.
दीपावलीसाठीची खरेदी दहा दिवस आधीच सुरू झाली असून बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक गाठला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि दरवाज्यासमोर तेजस्वी पणती यामुळे ‘पारंपरिक दीपावलीची पणती यंदाही तेजोमयतेने पेटली आहे.’
आकाशकंदील आणि पणत्यांमध्ये स्पर्धा
दीपावलीसाठी बाजारात आकाशकंदीलांची रेलचेल दिसून येत आहे. घरगुती पद्धतीने बनवलेले मोठे, आकर्षक आकाशकंदील आणि त्यात मातीच्या पणत्या ठेवून उजळवलेली घरे हे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. वाढलेल्या किमतींमुळे आकाशकंदील आणि पणत्यांमध्ये आता थेट स्पर्धा सुरू झाली आहे. दीपावली अवघ्या आठ दिवसांवर आली असून बाजारपेठेत रांगोळी रंग, विद्युत रोषणाईसाठी लाइटिंग, कपडे, मिठाई, भांडी, भेटवस्तू आणि गिफ्ट वस्तूंची मोठी खरेदी सुरू झाली आहे.
दीपावली पहाटचे मोठ्या प्रमाणात आयोजन
यंदा महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वर्ष असल्याने राजकीय रंगही बाजारात दिसत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दीपावली पहाट, भेटवस्तू कार्यक्रम आणि मदतीचे उपक्रम राजकीय नेत्यांकडून राबवले जात आहेत.
लक्ष्मीपूजन-भाऊबीज मुख्य दिवस
मुरबाड, माळशेज घाट परिसरात दीपावलीसाठी करांदे, रताळी, अलकुरे, चवळी यांसारख्या वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक दीपावली सजावटीत ‘मातीच्या पणत्या पेटवण्याची परंपरा’ जपली गेली आहे. दीपावलीतील लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हे मुख्य दिवस मानले जातात. मात्र या काळात आठ दिवस दरवाज्यात पणत्या पेटवून आकाशकंदील लावले जाते. गुरांना रंगरंगोटी करून त्यांच्या गळ्यात ढेढराच्या झाडाच्या मण्यांच्या माळा घालण्याची परंपरा आजही कायम आहे. गावोगावी या माळा बनवण्याच्या स्पर्धाही रंगत आहेत.