
डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवार उसंथ घेतली. अचानक सकाळी कामावर जाण्याची घाई होत असतांनाच वीज पुरवठा खंडित झाल्याने अेनक नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. बराच काळ वीज नसल्याने घरकामाला देखिल विलंब झाला.
काही काळानंतर महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. दुपारी २ वाजता काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र सकाळी सकाळी तब्बल आठ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने पावसाळ्यातील विजेचा लंपडावाला सुरूवात झाली की काय असा प्रश्न नागिरकांना पडला आहे. समाजसेवक अनिल ठक्कर यांनी महावितरण वीज कंपनीच्या डोंबिवली येथील कार्यालयात संपर्क केला असता, वीज पुरवठा पूर्ववत होण्यास पाच ते सहा तास लागतील असे उत्तर मिळाले.
याबाबत महावीज वितरण कंपनीचे अभियंता गायकवाड यांना संपर्क केला असता ते सदर भागातील तीन ते चार ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम चार-पाच तासात होईल असे सांगण्यात आले.
पावसामुळे डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील ट्रान्सफॉर्मरचे बांधकाम कोसळल्याने स्टेशन बाहेरील व आजूबाजूकडील परिसरात बत्ती गुल झाली होती.